झेलेन्स्की यांच्या अमेरिका दौऱ्यात बायडेन प्रशासन ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांच्या तैनातीची घोषणा करणार

- अमेरिकी माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की बुधवारी संध्याकाळी अमेरिका भेटीवर दाखल होत आहेत. पोलंडवरून निघालेल्या अमेरिकेच्या लष्करी विमानातून झेलेन्स्की राजधानी वॉशिंग्टनमध्ये उतरतील, अशी माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर झेलेन्स्की यांनी भेट देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. झेलेन्स्की आपल्या धावत्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून अमेरिकी संसदेलाही संबोधित करणार आहेत. अमेरिकेकडून अधिकाधिक शस्त्रास्त्रे मिळविणे हा झेलेन्स्की यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. ही बाब लक्षात घेऊन बायडेन प्रशासनाने युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांसह जवळपास दोन अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य जाहीर करण्याची तयारी केल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला.

‘पॅट्रियॉट’

गेल्या काही दिवसात रशिया व युक्रेनमधील संघर्ष अधिकाधिक प्रखर होत आहे. रशियाने क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, लढाऊ विमानांसह तोफा, रॉकेट्स यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. युक्रेनकडूनही रशियन भूभागांमधील शहरांमध्ये घातपात घडविण्यात येत असून इंधनसाठे तसेच लष्करी तळ लक्ष्य करण्यात आले आहेत. रशियन हल्ल्यांची तीव्रता मोठी असून राजधानी किव्हसह अनेक शहरांमधील वीजपुरवठा यंत्रणा व इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याचवेळी डोन्बास क्षेत्रातही रशियन फौजा धीम्या गतीने आगेकूच करीत असल्याने युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीसमोरील चिंता वाढल्याचे मानले जाते.

‘पॅट्रियॉट’

रशियाच्या प्रखर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच नव्या हल्ल्यांच्या तयारीचे दावे समोर येत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारुसला दिलेली भेट तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी घेतलेली बैठक यामुळे याला दुजोरा मिळाल्याचे सांगण्यात येते. ऐन हिवाळ्यात रशियाने नव्याने आक्रमण केल्यास युक्रेनचा टिकाव लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे युक्रेनने पाश्चिमात्यांकडून अधिकाधिक शस्त्र व अर्थसहाय्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. पॅट्रियॉट त्याचाच भाग असून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह वरिष्ठ नेते सातत्याने या क्षेपणास्त्र यंत्रणेचा उल्लेख करीत आहेत. सुरुवातीला अमेरिकी अधिकाऱ्यांनी ही मागणी नाकारली होती. मात्र रशियाच्या वाढत्या हल्ल्यांनंतर त्यावर फेरविचार करून युक्रेनची मागणी मान्य करण्यात आल्याचे अमेरिकी सूत्रांनी स्पष्ट केले.

अमेरिकेने युक्रेनमध्ये ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे पाठविण्याचा निर्णय घेतल्यास ही बाब जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा रशियाने दिला होता. युक्रेनमधील पॅट्रियॉट यंत्रणा रशियन संरक्षणदलांचे लक्ष्य असतील, असेही रशियाकडून बजावण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बायडेन प्रशासनाने पॅट्रियॉट पुरविण्याची तयारी केली आहे. बुधवारच्या बैठकीत पॅट्रियॉट यंत्रणेबरोबरच जवळपास १.८ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा करण्यात येईल, असे वृत्त अमेरिकी माध्यमांनी दिले आहे.

‘पॅट्रियॉट’

पॅट्रियॉटचा पल्ला दीडशे किलोमीटर्सहून अधिक असून क्षेपणास्त्रे व लढाऊ विमानांना भेदण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने सध्या युरोप तसेच आखाती देशांसह जपानमधील तळांवर ही क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. गेल्या शतकात झालेल्या आखाती युद्धात अमेरिकेने या क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर युक्रेनला ही यंत्रणा देण्याचे संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची अमेरिका भेट व पॅट्रियॉटची संभाव्य घोषणा यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून पुरविण्यात येणारी नवी शस्त्रे युक्रेनमधील संघर्षाला अधिकच चिथावणी देणारी ठरणार असून शांतीचर्चेची कोणतीही शक्यता दिसत नाही, असे रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info