रशियाकडून युक्रेन संघर्षाची व्याप्ती वाढविण्यासाठी जोरदार हालचाली

- राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून संरक्षणदलांच्या सज्जतेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील संघर्षासाठी रशियन सरकार संरक्षणदलांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. बुधवारी रशियन संरक्षणदलाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत पुतिन यांनी आण्विक सज्जता, हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची तैनाती तसेच लष्करातील जवानांची संख्या वाढविण्याबाबत महत्त्वाच्या घोषणाही केल्या. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलेल्या या घोषणा रशिया युक्रेनमध्ये दीर्घकालिन संघर्षासाठी सज्ज होत असल्याचे संकेत देणाऱ्या ठरल्या आहेत. गेल्या काही दिवसात युक्रेन, ब्रिटन तसेच पाश्चिमात्य माध्यमांनी रशिया नव्या आक्रमणाची तयारी करीत असल्याचे दावे केले होते. पुतिन व वरिष्ठ नेत्यांचा बेलारुस दौरा आणि सलग दोन दिवस पुतिन यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीतून त्याला दुजोरा मिळाला आहे. मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियन गुप्तचर यंत्रणांची बैठक घेऊन त्यांना ‘इंटेलिजन्स गॅदरिंग’बाबत सूचना दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर बुधवारी रशियन राष्ट्राध्यक्षांनी संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दीर्घकालिन बैठक घेतली.

संघर्षाची व्याप्ती

बैठकीच्या सुरुवातीलाच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, रशियन सरकार व जनता संरक्षणदलांना कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. युक्रेन संघर्षासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीवर कसलीही मर्यादा नसून संरक्षणदलांना आवश्यक त्या सर्व गोष्टी मिळतील, असेही पुतिन म्हणाले. ‘मला आशा आहे की सरकारकडून योग्य सहकार्य मिळाल्यानंतर संरक्षणदले योग्य प्रतिसाद देतील व मोहीमेत अपेक्षित यश मिळेल’, असा विश्वासही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला. युक्रेनमधील संघर्ष हा तिसऱ्या देशांच्या धोरणांमुळे भडकल्याचा ठपकाही पुतिन यांनी यावेळी ठेवला.

संरक्षणदलांबरोबर झालेल्या बैठकीत, पुतिन यांनी ‘सरमाट’ हे नवे अण्वस्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातील रशियन संरक्षणदलांमध्ये सामील होईल, असा दावा केला. त्याचवेळी येत्या काही आठवड्यात ‘झिरकॉन’ हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र रशियन नौदलात तैनात होईल, असेही सांगितले. रशियाच्या संरक्षणदलांची क्षमता पाच लाखांनी वाढवून ती 15 लाख जवानांपर्यंत नेण्यात येईल, असेही बैठकीदरम्यान जाहीर केले. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेेई शोईगू यांनी याला दुजोरा दिला असून फिनलंड व स्वीडनच्या नाटोतील सहभागाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम भागात नवी तैनाती केली जाईल, अशी माहिती दिली.

डोनेत्स्कमधील हल्ल्यात रशियाचे माजी उपपंतप्रधान रोगोझिन जखमी

संघर्षाची व्याप्ती

डोनेत्स्क – युक्रेनी लष्कराने ‘प्रिसिजन वेपन’चा वापर करून चढविलेल्या हल्ल्यात रशियाचे माजी उपपंतप्रधान दिमित्रि रोगोझिन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबर डोनेत्स्कमधील वरिष्ठ नेते विताली खोत्सेन्कोदेखील जखमी झाल्याची माहिती रशियन सूत्रांनी दिली. डोनेत्स्क शहराच्या सीमेवर असलेल्या एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.

डोन्बास क्षेत्रात सध्या रशिया व युक्रेनच्या लष्करादरम्यान प्रखर संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनी लष्कराने डोनेत्स्कवर मोठ्या प्रमाणात रॉकेट व तोफांचा माराही केला होता. रोगोझिन हे पूर्व युक्रेनमधील रशियन मोहिमेसाठी एका विशेष युनिटसह दाखल झाले होते, असा दावा करण्यात येतो

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info