रशियाच्या एन्गेल्स हवाईतळावर युक्रेनचा ड्रोन हल्ला

- तीन जणांचा बळी, विमानांचे नुकसान झाल्याचे दावे

हवाईतळावर

मॉस्को/किव्ह – सोमवारी युक्रेनने रशियाच्या ‘एन्गेल्स’ हवाईतळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन रशियन जवानांचा बळी गेला. हल्ल्यादरम्यान काही रशियन विमानांचे नुकसान झाल्याचे दावे करण्यात आले असले, तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही. युक्रेनचे ड्रोन नियोजित लक्ष्यावर धडकण्यापूर्वीच उडविण्यात आले, असे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. युक्रेनने ‘एन्गेल्स’ हवाईतळावर ड्रोन हल्ला चढविण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ ठरते. यापूर्वी ५ डिसेंबर रोजी ‘एन्गेल्स’ व ‘रायझान’ या दोन तळांवर ड्रोन हल्ले करण्यात आले होते. त्यात रशियाच्या बॉम्बर्स विमानांचे नुकसान झाल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते.

हवाईतळावर

गेल्या काही महिन्यांमध्ये रशियाच्या संरक्षणतळांसह इंधन प्रकल्प, रेल्वेमार्ग, ऊर्जाप्रकल्प व शॉपिंग मॉल्सवर सातत्याने हल्ले होत आहेत. हे हल्ले म्हणजे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ आणि नाटोतील सदस्य देशाच्या हेरगिरी यंत्रणांनी एकत्र येऊन रशियाविरोधात छेडलेले ‘छुपे युद्ध’ असल्याचा दावा अमेरिकेतील माजी वरिष्ठ अधिकारी जॅक मर्फी यांनी केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सदर हल्ल्यांना मंजुरी दिल्याचेही मर्फी यांनी म्हटले होते. अमेरिकी प्रशासनाने युक्रेनलाही रशियन भूभागात खोलवर हल्ले करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

हवाईतळावर

या पार्श्वभूमीवर रशियाच्या हवाईतळावर सलग दुसऱ्यांदा होणारा ड्रोन हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. सोमवारी पहाटे झालेल्या हल्ल्याची युक्रेनी लष्कराने अधिकृतरित्या जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र रशिया युक्रेनमध्ये जे काही करीत आहे, त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील, अशी आक्रमक प्रतिक्रिया युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. रशियाच्या भूभागात खोलवर हल्ले होऊ शकत नाही, असे रशियन यंत्रणांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असून असे हल्ले यापुढे सातत्याने होत राहतील, असा इशाराही युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिला. युक्रेनने यापूर्वी क्रिमिआ, बलगोरोद, ब्रिआंस्क अशा रशियन हद्दीतील लष्करी तळांवर हल्ले चढविले होते. मात्र हे सर्व तळ रशिया-युक्रेन सीमेनजिक आहेत. एन्गेल्ससारखा तळ युक्रेनी सीमेपासून तब्बल ७५० किलोमीटर्सवर आहे. या तळावर युक्रेनवरील हल्ल्यांसाठी बॉम्बर्स विमाने तैनात केलेली आहेत. त्यामुळे रशियन हद्दीच्या इतक्या आत असणाऱ्या तळावरील हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. युक्रेनच्या या हल्ल्यापूर्वी रविवारी रशियाने डोन्बास क्षेत्रासह खार्किव्ह, खेर्सन व झॅपोरिझिआमध्ये हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रांसह तोफा व रॉकेट्सचा वापर करण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रशिया व युक्रेनचा शेजारी देश असणाऱ्या बेलारुसने रशियन बनावटीच्या ‘इस्कंदर’ क्षेपणास्त्रांची तैनाती केल्याचे जाहीर केले. इस्कंदरचा पल्ला ५०० किलोमीटर्सपर्यंत असून त्यात ‘न्यूक्लिअर वॉरहेड’ वाहून नेण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते. बेलारुसमध्ये इस्कंदर तेनात होत असतानाच रशियाने आपल्या भूभागात ‘एस-३००व्ही’ या हवाईसुरक्षायंत्रणांची अतिरिक्त तैनाती सुरू केल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

अण्वस्त्रांमुळेच पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात युद्धाची घोषणा केलेली नाही – माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह

मॉस्को – ‘रशियाकडे असलेली अण्वस्त्रे व त्याच्या वापरसांदर्भातील धोरण याची जाणीव असल्यामुळेच पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात उघडपणे युद्ध पुकारलेले नाही. रशियाला जर खरेच धोका निर्माण झाला तर तो अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे’, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. त्यामुळेच पाश्चिमात्य आघाडी आण्विक संहार टाळण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसऱ्या बाजूला रशियाला अधिकाधिक अपमानित व खिळखिळे करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही मेदवेदेव्ह यांनी यावेळी केला. रशियाला जोपर्यंत सुरक्षाविषयक हमी मिळत नाही तोपर्यंत जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा इशाराही त्यांनी रशियन दैनिकात लिहिलेल्या एका लेखात दिला आहे.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info