अमेरिकी अर्थव्यवस्थेला 1970च्या दशकाप्रमाणे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल

- अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदारांचा इशारा

अमेरिकी अर्थव्यवस्थेला 1970च्या दशकाप्रमाणे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल

वॉशिंग्टन – वाढती महागाई, सरकारी अर्थसहाय्य व फेडरल रिझर्व्हची धोरणे यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला 1970च्या दशकाप्रमाणे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार देत आहेत. अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था असलेल्या ‘बँक ऑफ अमेरिका’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. अमेरिकेतील गुंतवणूक व भांडवली बाजारपेठेचा भाग असलेल्या 92 टक्के ‘फंड मॅनेजर्स’नी यावर्षी देशाला 1970च्या दशकाप्रमाणे ‘स्टॅग्‌‍फ्लेशन’चा सामना करावा लागेल, असे बजावले. तर अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’चे माजी गव्हर्नर ॲलन ग्रीनस्पॅन यांनी अमेरिकी अर्थव्यवस्था लवकरच मंदीत जाईल, असे भाकित केले आहे.

आर्थिक संकटाला सामोरे

कोरोनाची साथ व त्यापाठोपाठ सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील महागाई प्रचंड प्रमाणात भडकली आहे. महागाई निर्देशांक गेल्या चार दशकांमधील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे धोरण राबविले आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेतील व्याजदर तब्बल सात वेळा वाढविण्यात आला असून सध्या तो साडेचार टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचवेळी बायडेन प्रशासनाने सामाजिक योजना व ‘मेक इन अमेरिका’सारख्या धोरणांना प्राधान्य देत ट्रिलियन डॉलर्सहून अधिक अर्थसहाय्याची घोषणा केली आहे.

आर्थिक संकटाला सामोरे

या सगळ्याचे विपरित परिणाम अमेरिकी अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. महागाईचा भडका अद्यापही कायम असून उत्पादनांची मागणी घटण्यास सुरुवात झाली आहे. मागणी घटल्याने शेकडो कंपन्यांची आर्थिक समीकरणे बिघडली असून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान तसेच ग्राहक क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या वर्षभरात दीड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. यात तंत्रज्ञान क्षेत्रातील ॲमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर यासारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. ॲमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस, ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यासह जेपी मॉर्गन, गोल्डमॅन सॅक्स यासारख्या वित्तसंस्थांच्या प्रमुखांनी उघडपणे आर्थिक संकटाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.

आर्थिक संकटाला सामोरे

‘बँक ऑफ अमेरिका’च्या नव्या सर्वेक्षणातूनही याला दुजोरा मिळाला आहे. या सर्वेक्षणात अमेरिकेतील भांडवली व वित्त बाजारपेठेचे केंद्र असणाऱ्या ‘वॉल स्ट्रीट’वरील कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यातील 92 टक्के फंड मॅनेजर्सनी यावर्षी अमेरिकी अर्थव्यवस्थेला ‘स्टॅग्‌‍फ्लेशन’चा सामना करावा लागेल, असे मत नोंदविले. महागाईचा भडका, अर्थव्यवस्थेची गती मंदावणे व बेरोजगारीत वाढ होत राहणे ही स्थिती ‘स्टॅग्‌‍फ्लेशन’ म्हणून ओळखण्यात येते. यापूर्वी 1970च्या दशकात अमेरिकेला ‘स्टॅग्‌‍फ्लेशन’ला तोंड द्यावे लागले होते. अमेरिकेतील ‘स्टॅग्‌‍फ्लेशन’ जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असून जागतिक अर्थव्यवस्थेलाही मंदीला सामोरे जावे लागेल, असे मत 77 टक्के फंड मॅनजर्सनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख ॲलन ग्रीनस्पॅन यांनी, अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत जाणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. फेडरल रिझर्व्ह सध्या जे काही निर्णय घेत आहे त्याची परिणिती आर्थिक मंदीत होणार असल्याचे दिसते, असे वक्तव्य ग्रीनस्पॅन यांनी केले आहे. ग्रीनस्पॅन यांनी 1987 ते 2006 या कालावधीत तब्बल पाच वेळा फेडरल रिझर्व्हचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info