‘वॉर इकॉनॉमी’ असलेला रशिया युक्रेनमधील संघर्ष दीर्घकाळ सुरू ठेवण्याच्या तयारीत

- युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

किव्ह/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले निर्णय रशियाला ‘वॉर इकॉनॉमी’ कडे घेऊन जाणारे असल्याचा दावा युक्रेन व पाश्चिमात्य माध्यमांनी केला आहे. यामागे युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळपर्यंत चालू ठेवण्याची योजना असू शकते, असे युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्नीकोव्ह यांनी बजावले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, नव्या लष्करी भरतीसह शस्त्रानिर्मितीचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले होते. काही दिवसांपूर्वीच युक्रेनमधील लष्करी मोहिमेची जबाबदारी देशाच्या संरक्षणदलप्रमुखांकडे सोपविण्याची घोषणाही करण्यात आली होती.

‘वॉर इकॉनॉमी’

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अर्थव्यवस्था व देशातील संरक्षणनिर्मिती उद्योगाची फेररचना करणारे निर्णय घेतले आहेत. नजिकच्या काळात रशियात मार्शल लॉ लागू होऊ शकतो. या गोष्टी रशियन लष्कराची क्षमता वाढविणाऱ्या व त्यांच्यासाठी योग्य वातावरण तयार करणाऱ्या ठरतील. रशिया आपली सर्व लष्करी क्षमता युक्रेनमधील युद्ध अधिकाधिक काळ चालू ठेवण्यासाठी करेल. संरक्षणदलप्रमुख जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याकडे युक्रेनमधील लष्करी मोहिमेची जबाबदारी सोपविण्याचा निर्णयही युद्ध पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्याच्या हालचालींचा भाग आहे’, असे युक्रेनच्या डिफेन्स इंटेलिजन्सने बजावले.

‘वॉर इकॉनॉमी’

युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्नीकोव्ह यांनीही याला दुजोरा दिला. रशिया येत्या ‘स्प्रिंग’मध्ये (वसंत ॠतू) युक्रेनविरोधात नवे आक्रमण करण्याच्या तयारीत असून युक्रेननेही सज्जता ठेवायला हवी, असे रेझ्नीकोव्ह यांनी बजावले. पूर्व व दक्षिण युक्रेनमध्ये ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये रशिया लष्करी तुकड्या तसेच शस्त्रांची जमवाजमव करीत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र त्याचवेळी रशिया बेलारुसच्या मार्गे हल्ला चढविणार नाही, असा दावाही युक्रेनी संरक्षणमंत्र्यांनी केला.

‘वॉर इकॉनॉमी’काही दिवसांपूर्वीच रशियाने पूर्व युक्रेनमधील सोलेदार शहरावर ताबा मिळविला होता. या ताब्यानंतर राजधानी किव्हसह खार्किव्ह व ओडेसामध्ये मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यात आले होते. खार्किव्ह तसेच सुमी परिसरात रशियाने मोठ्या प्रमाणात तोफा व रॉकेटस्‌‍चा मारा सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे. दक्षिण युक्रेनमधील खेर्सन शहर व परिसरातही रशियाकडून सातत्याने मारा सुरू आहे. सोलेदारनंतर पुढील काही दिवसांमध्ये रशिया बाखमतचा ताबा घेईल, असे सांगण्यात येते.

गेल्या काही दिवसात रशियन राजवटीकडून युक्र्रेनमधील संघर्ष हा युक्रेन सरकार अथवा फौजांविरोधात नाही तर नाटोविरोधात सुरू असलेली लढाई असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचवेळी नजिकच्या काळात रशिया आपल्या हल्ल्यांची व्याप्ती अधिक वाढवेल व त्यात ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा समावेश असू शकतो, असे इशारेही देण्यात आले आहेत. त्याचवेळी रशियन माध्यमे व विश्लेषक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पुढील काही दिवसात युक्र्रेनमधील मोहिमेची फेररचना होऊ शकते, असे दावेही करीत आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे संरक्षणमंत्री व गुप्तचर यंत्रणा यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info