युक्रेनविरोधातील रशियाचे नवे आक्रमण सुरू झाले आहे

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा इशारा

ब्रुसेल्स/मॉस्को – युक्रेनविरोधातील रशियाचे मोठे व नवे आक्रमण आधीच सुरू झाल्याचे दिसत आहे व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन शांततेसाठी तयार असल्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. मंगळवारपासून ब्रुसेल्समध्ये नाटो सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक सुरु होत आहे. या बैठकीत युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्याच्या मुद्यावर चर्चा होणार असून नव्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाटोच्या प्रमुखांनी केलेले वक्तव्य सदस्य देशांवर टाकण्यात येणाऱ्या दबावतंत्राचा भाग असावा, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

नवे आक्रमण

गेल्या काही दिवसांपासून युक्रेनी यंत्रणांसह पाश्चिमात्य देश रशिया नवे आक्रमण करणार असल्याचे इशारे सातत्याने देत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी, येत्या दहा दिवसात रशिया युक्रेनवर नव्या हल्ल्यांसह मोठे आक्रमण करील असे बजावले होते. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणा, युरोपिय यंत्रणा तसेच पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडूनही रशियाच्या आक्रमणाबाबत वक्तव्ये केली जात आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी काही दिवस रशिया आक्रमणाला सुरुवात करील, असे सांगण्यात येत होते.

नवे आक्रमण

पण नाटोच्या प्रमुखांनी गेल्या काही दिवसातील घटनांकडे लक्ष वेधून रशियाचे नवे आक्रमण आधीच सुरू झाल्याकडे लक्ष वेधले आहे. ‘राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह रशियन राजवटीला अजूनही युक्रेनवर नियंत्रण मिळवायचे आहे. पुतिन यांच्याकडून सातत्याने युक्रेनमध्ये नवे सैन्य, नवी शस्त्रे व नव्या यंत्रणा धाडल्या जात आहेत’, असा दावाही स्टॉल्टनबर्ग यांनी केला. रशियाच्या नव्या हालचालींची जाणीव करून देताना युक्रेनला लवकरात लवकर व मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा व्हायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

नवे आक्रमण

‘युक्रेनमधील युद्धात शस्त्रास्त्रे प्रचंड प्रमाणात वापरली जात आहेत. युक्रेन अतिशय वेगाने व मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्रीचा वापर करीत आहे. त्यामुळे नाटो व सहकारी देशांकडील शस्त्रसाठा घटतो आहे. सदस्य देशांच्या निर्मितीपेक्षा युक्रेनकडून होणारा वापर अनेक पटींनी जास्त आहे. यामुळे नाटो सदस्य देशांच्या संरक्षण उद्योगावर चांगलाच ताण आला आहे’, असा दावाही नाटोच्या प्रमुखांनी केला. एका अहवालानुसार युक्रेनी लष्कर दररोज सहा ते सात हजार ‘आर्टिलरी शेल्स’चा वापर करीत आहे.

दुसऱ्या बाजूला रशियाकडूनही युक्रेनच्या विविध भागांमध्ये जबर हल्ल्यांचे सत्र कायम राहिले आहे. रविवार तसेच सोमवारी रशियाने बाखमत शहर व परिसरात प्रचंड प्रमाणात बॉम्ब्स तसेच मॉर्टर्स व रॉकेटस्‌‍चा वर्षाव केला. डोनेत्स्क, लुहान्स्क प्रांत व खार्किव्हमधील विविध भागांमध्येही मारा सुरू आहे. कुपिआन्स्क, क्रास्नि लिमन व खार्किव्हनजिकच्या क्षेत्रात रशियन फौजांनी केलेल्या कारवाईत २५०हून अधिक युक्रेनी जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. दरम्यान, युक्रेनी लष्कर येत्या काही दिवसांमध्ये बाखमत शहरातून माघार घेईल असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info