रशिया व अमेरिका अणुयुद्धाच्या जवळ जात आहेत

- रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – ‘सध्याच्या काळात सर्वात मोठा धोका आण्विक शक्तींमधील थेट लष्करी संघर्ष हाच आहे आणि दुर्दैवाने हा धोका वाढतोच आहे’, असा इशारा रशियाचे वरिष्ठ अधिकारी व्लादिमिर येर्माकोव्ह यांनी दिला. ‘अमेरिका व रशियामध्ये सध्या जबरदस्त तणाव असून अमेरिका अधिकाधिक चिथावणी देणाऱ्या कारवाया करीत आहे. या कारवाया सुरू राहिल्या तर दोन देशांमधील लष्करी संघर्षाची शक्यता अधिकच वाढेल आणि हा संघर्ष संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब ठरेल’, असेही येर्माकोव्ह यांनी पुढे बजावले.

अमेरिका

व्लादिमिर येर्माकोव्ह हे रशियाच्या परराष्ट्र विभागातील ‘नॉन प्रोलिफरेशन ॲण्ड आर्म्स कंट्रोल डिपार्टमेंट’चे प्रमुख आहेत. रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रशिया व अमेरिका अणुयुद्धाच्या अधिकाधिक जवळ जात असल्याचा इशारा दिला. यामागे अमेरिकेची धोरणे व कारवाया प्रमुख कारण असल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिका व नाटोकडून युक्रेनला सुरू असणारा अविरत शस्त्रपुरवठा आणि इतर हस्तक्षेप चिथावणी देणारा असल्याकडे येर्माकोव्ह यांनी लक्ष वेधले.

अमेरिका

परिस्थिती सुधारायची असेल तर अमेरिकेने ठोस पावले उचलून तणाव कमी करातला हवा व रशियाच्या सुरक्षेला कमी लेखण्याचे प्रयत्न थांबवावेत असा सल्ला रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. येर्माकोव्ह आण्विक संघर्षाच्या धोक्याची जाणीव करून देत असतानाच रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तविली आहे.

‘शेवटची काडी किंवा ट्रिगर नक्की काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. पण तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वाढली आहे. आपण सर्वांनी सर्वंकष तिसऱ्या महायुद्धाचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तिसरे महायुद्ध व्हावे अशी रशियाची इच्छा नाही’, असे मेदवेदेव्ह म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना आण्विक सज्जतेची जाणीव करून दिली होती. त्यानंतर रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा करून खळबळ उडविली होती.

अमेरिका

दरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात रशियाने प्रगत ‘टी-१४ आर्माटा’ या रणगाड्याचा समावेश केला आहे. युक्रेनच्या आघाडीवर १० हून अधिक रणगाडे पाठविण्यात आल्याचे वृत्त रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे. प्रगत तंत्रज्ञान व संरक्षक कवचाचा वापर असलेल्या या रणगाड्याचा वेग ताशी ८० किलोमीटर्स आहे. रशियाच्या संरक्षणदलात असलेल्या रणगाड्यांमध्ये हे सर्वात प्रगत व आधुनिक रणगाडे म्हणून ओळखण्यात येतात. ‘टी-१४ आर्माटा’ युद्धाच्या आघाडीवर पाठवून युक्रेनमधील संघर्ष पुढील काळात अधिक तीव्र करण्याचे संकेत रशियाने दिले असल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला.

दरम्यान, रशियाने डोनेत्स्कमधील युक्रेनच्या तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ६० परदेशी जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. या हल्ल्यासाठी रशियाने ‘इस्कंदर’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे सांगण्यात येते. ठार झालेले जवान ‘जॉर्जियन लिजन’ या तुकडीचा भाग होते, अशी माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात १५हून अधिक लष्करी वाहनांसह मोठा शस्त्रसाठाही उद्ध्वस्त करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info