पाश्चिमात्यांच्या रानटी महत्त्वाकांक्षेने रशियाविरोधात युद्ध छेडले आहे

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची घणाघाती टीका

पाश्चिमात्यांच्या रानटी महत्त्वाकांक्षेने रशियाविरोधात युद्ध छेडले आहे

मॉस्को  – पाश्चिमात्यांची रानटी महत्त्वाकांक्षा व अहंकार युक्रेनमधील संघर्षासाठी कारणीभूत असून त्यांनी रशियन मातृभूमीविरोधात युद्ध छेडले आहे, अशी घणाघाती टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. राजधानी मॉस्कोत मंगळवारी आयोजित केलेल्या ‘व्हिक्टरी डे’ कार्यक्रमात रशियन राष्ट्राध्यक्षांनी पाश्चिमात्यांवर जबरदस्त कोरडे ओढले. पाश्चिमात्य अजूनही वर्चस्ववादी मानसिकतेतून बाहेर पडले नसून त्यांच्या हितसंबंधांसाठी लोकांमध्ये संघर्ष घडविणे, समाजात फूट पाडणे, रक्तरंजित संघर्षांना चिथावणी देणे आणि कौटुंबिक व पारंपरिक मूल्ये उद्ध्वस्त करण्यासारख्या कारवाया करीत असल्याची जाणीव पुतिन यांनी यावेळी करून दिली.

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीविरोधात मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून ९ मे रोजी रशियात ‘व्हिक्टरी डे’ साजरा करण्यात येतो. या दिवशी रशियात परदेशी नेत्यांच्या उपस्थितीत भव्य लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात येते. रशिया-युक्रेन युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे यावर्षी ‘व्हिक्टरी डे’ कार्यक्रमातील अनेक गोष्टींना कात्री लावण्यात आली होती. त्याचवेळी परदेशी नेत्यांमध्येही रशियापुरस्कृत ‘सीआयएस’ या गटातील सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचीच उपस्थिती दिसून आली.

राजधानी मॉस्कोमध्ये पार पडलेल्या लष्करी संचलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चिमात्यांवर आक्रमक टीकास्त्र सोडले. युक्रेनमधील संघर्षासाठी पाश्चिमात्य देशांची धोरणेच जबाबदार असल्याचे सांगून त्यांनी युक्रेनी जनतेला वेठीस धरले असल्याचा ठपका पुतिन यांनी ठेवला. गेल्या शतकात नाझी राजवटीने जगावर वर्चस्व मिळविण्याबाबत केलेले दावे व त्यामुळे झालेले परिणाम यांचा पाश्चिमात्य देशांना विसर पडला असल्याची जाणीव रशियन राष्ट्राध्यक्षांनी करून दिली.

राक्षशी मनोवृत्तीच्या भयावह नाझी राजवटीचा पराभव कोणी केला व युरोपिय जनतेच्या स्वातंत्र्यासाठी कोण भिंत म्हणून उभे राहिले याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप पुतिन यांनी यावेळी केला. पाश्चिमात्यांची वर्चस्ववादाची विचारसरणी घातक व गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचा दावाही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. याच विचारसरणीतून रशियावर संघर्ष लादण्यात आला असून रशियाचे लष्कर देशातील जनतेच्या सुरक्षेची काळजी घेईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी बजावले.

जग सध्या पुन्हा एकदा निर्णायक वळणावर उभे असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. मंगळवारी रशियात झालेला ‘व्हिक्टरी डे’चा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे रशियाचे सामर्थ्य व ताकद दाखविणारा नव्हता, असा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला आहे. या कार्यक्रमामध्ये लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके तसेच नव्या शस्त्रांचे प्रदर्शन टाळण्यात आल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. व्हिक्टरी डे कार्यक्रमात नेहमीचा डामडौल नसणे हे रशियाच्या घटलेल्या क्षमतेचे संकेत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

English    हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info