रशियाचे युक्रेनची राजधानी किव्हवर जबरदस्त ड्रोन हल्ले

मॉस्को – युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने युद्ध सुरू झाल्यापासून केले नव्हते, इतक्या तीव्रतेचे जबरदस्त ड्रोन हल्ले चढविले आहेत. रशियाच्या भूभागात युक्रेनने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल रशियाने हा ड्रोन्सचा मारा केल्याचे दिसते. इराणने रशियाला पुरविलेल्या शाहेद ड्रोन्सचा यासाठी वापर करण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. मारा केलेल्या ५४ ड्रोन्सपैकी ४० ड्रोन्स राजधानी किव्हला लक्ष्य करणारे होते, असा दावा केला जातो. तर ५४ पैकी ५२ ड्रोन्स युक्रेनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदल्याचे दावे देखील युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केले आहेत.

जबरदस्त ड्रोन हल्ले

रशियन सैन्याने युक्रेनच्या बाखमत तसेच भूभागांमध्ये आघाडी घेतली आहे. बाखमतमधील पराजयानंतर युक्रेनने प्रतिहल्ल्याची जोरदार तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत. लवकरच युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांचे जबरदस्त सत्र सुरू होईल व रशियाला आधी ताब्यात घेतलेला भूभाग सोडून माघार घ्यावी लागेल, असे संकेत पाश्चिमात्य देश देत आहेत. त्याचवेळी युक्रेनचे लष्कर प्रतिहल्ल्यासाठी अजूनही तयार नसल्याचे दावे काहीजणांनी केले आहेत. त्यामुळे युक्रेनी लष्कराचे प्रतिहल्ले अमेरिका व नाटोचे लष्करी सहकार्य आणि सहभागावर अवलंबून असतील, असे संकेत मिळत आहेत. रशियालाही याची जाणीव झालेली आहे.

जबरदस्त ड्रोन हल्ले

म्हणूनच रशियाने युक्रेनला परिणामांची जाणीव करून देण्यासाठी राजधानी किव्हला लक्ष्य केल्याचे दिसते. किव्हवरील ड्रोन्सचे हल्ले म्हणजे रशियाने युक्रेनी प्रतिहल्ल्याच्या आधी सुरू केलेल्या हालचाली ठरतात. लष्करी पातळीवर या हालचाली सुरू असतानाच, रशियाचे राजनैतिक अधिकारी पाश्चिमात्य देशांना युक्रेनच्या युद्धातील सहभागावरून सज्जड इशारे देत आहेत. नाटो देश, त्यातही ब्रिटनकडून युक्रेनला दिले जाणारे लष्करी सहाय्य, या युद्धाचा भडका वाढविणारे ठरेल, असे ब्रिटनमधील रशियाचे राजदूत आंद्रेई केलिन यांनी बजावले आहे.

युक्रेनच्या युद्धाला एका वर्षाहून अधिक काळ उलटलेला असला, तरी रशियाने अजूनही आपल्याकडील अफाट स्त्रोतांचा खऱ्या अर्थाने वापर सुरू केलेलाच नाही, अशा शब्दात राजदूत आंद्रेई केलिन यांनी युक्रेनच्या युद्धाची तीव्रता रशिया प्रचंड प्रमाणात वाढवू शकेल, असे बजावले आहे. इतकेच नाही तर याचे परिणाम ब्रिटनलाही भोगावे लागतील, असा संदेश आपल्या सूचक विधानांद्वारे राजदूत केलिन यांनी दिला. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला अधिकाधिक शस्त्रे पुरविली तर हे युद्ध व्यापक होईल आणि त्याचे परिणाम भयावह असतील, याकडेही रशियन राजदूतांनी लक्ष वेधले.

जबरदस्त ड्रोन हल्ले

तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेला धमकावले. युक्रेनला एफ-१६ लढाऊ विमाने पुरविण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. याचे भयंकर परिणाम होतील, याची जाणीव असलेली काही समंजस मंडळी आहेत. पण सारेकाही वॉशिंग्टन, लंडन आणि अमेरिकेच्या युरोपिय महासंघातील हस्तकांकडून घडविले जात आहे. हा सारा रशियाला आपली वसाहत बनविण्याच्या कटाचा भाग आहे. पण तसे करण्याच्या नादात पाश्चिमात्य देश विस्तवाशी खेळ करीत आहेत, असा इशारा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रशियाने आपली अण्वस्त्रे बेलारूसमध्ये तैनात करण्याबाबतचा करार केला होता. ही अण्वस्त्रे बेलारूसमध्ये तैनात केली जात आहेत, अशी माहिती या देशाचे राष्ट्राध्यक्ष लुकाशिन्को यांनी दिली होती. त्यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची तीव्र प्रतिक्रिया आली, पण रशियाने आपण याची पर्वा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे खरोखरच युक्रेनचे युद्ध भयंकर संहाराच्या दिशेने जलदगतीने प्रवास करीत असल्याचे दिसू लागले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info