Breaking News

इस्रायल-हिजबुल्लाह युद्धात इराण सहभागी होईल – अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍याचा दावा

वॉशिंग्टन – ‘इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध पेटले तर ते युद्ध या दोघांपुरते मर्यादित राहणार नाही. इराण या युद्धात खेचला जाईल आणि तसे झाले तर या युद्धाची व्याप्ती अनेक पटींनी वाढेल’, अशी चिंता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी ‘डेव्हिड कॅटलर’ यांनी व्यक्त केली. इस्रायलचे नेते हिजबुल्लाह संघटनेला संपविण्याच्या धमक्या देत आहेत. तर हिजबुल्लाहचे प्रमुख नेते इस्रायलच्या सर्वनाशाची घोषणा उघडपणे करीत आहेत. अशा परिस्थितीत कॅटलर यांनी या युद्धावर चिंता व्यक्त करून या युद्धाची व्याप्ती भयंकर असेल, याची जाणीव करून दिली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेतील ‘निअर ईस्ट’ विभागाचे व्यवस्थापक असलेल्या कॅटलर यांनी एका अभ्यासगटाशी बोलताना पश्‍चिम आखातातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. या क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा कॅटलर यांनी केला. इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील युद्ध आता वास्तविकता बनल्याचे कॅटलर म्हणाले. ‘इस्रायल आणि लेबेनॉनच्या हिजबुल्लाह यांच्यात युद्ध पेटले तर त्यामध्ये इराण उघडपणे उतरेल आणि त्यानंतर या युद्धामध्ये लिव्हंटही (लिव्हंट-भूमध्य समुद्राजवळ असलेला आत्ताचा लेबेनॉन, सिरिया, सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त, इराक आणि पॅलेस्टाईन असा मोठा भूभाग) खेचला जाईल. या व्यतिरिक्त इस्रायलच्या समर्थनासाठी अमेरिका आणि मित्रदेशही या युद्धात सहभागी होतील’, असा इशारा कॅटलर यांनी दिला. त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष आखाती तसेच पाश्‍चिमात्य देशांनाही खेचू शकतो, अशी चिंता कॅटलर यांनी व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील तणाव विकोपाला जात असल्याचे दिसत आहे. सिरियातील संघर्षाच्या आड हिजबुल्लाहला मिळत असलेले लष्करी सहाय्य, गोलन टेकड्यांच्या सीमेजवळ हिजबुल्लाह व इराणची लष्करी जमवाजमव, लेबेनॉनच्या दक्षिण सीमेजवळ हिजबुल्लाहचे शस्त्रास्त्रांचे कोठार आणि भूमध्य समुद्रात हिजबुल्लाह करीत असलेले इंधनाचे उत्खनन यामुळे इस्रायल व हिजबुल्लाहमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू, संरक्षणमंत्री एवीग्दोर लिबरमन यांनी हिजबुल्लाहवर हल्ले चढविण्याचे इशारे दिले होते. इस्रायलच्या या आक्रमक भूमिकेचे अमेरिकेनेही समर्थन केले होते.

यानंतर हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाने इस्रायलच्या विनाशाची घोषणा केली होती. आपली क्षेपणास्त्रे इस्रायलचे दिमोना अणुप्रकल्प, हैफा शहर आणि तेल अवीवला राख करतील, अशी धमकी नसरल्लाने दिली होती. त्याचबरोबर इस्रायलविरोधी संघर्षासाठी लेबेनॉनच्या लष्कराने तयार रहावे, असे आवाहनही हिजबुल्लाह प्रमुखाने केले होते. या सुमारास लेबेनॉनच्या सीमेवर हिजबुल्लाहने सुमारे पाच हजार क्षेपणास्त्रे जमा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. हिजबुल्लाहच्या एका कमांडरने सदर माहिती दिली होती. यानंतर इस्रायल व अमेरिकेने हिजबुल्लाहविरोधात अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली होती.

दोन दिवसांपूर्वी हिजबुल्लाहचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता ‘शेख नईम कासेम’ यानेही अमेरिका आणि इस्रायलला धमकावले आहे. अमेरिका आणि इस्रायलने लेबेनॉनवर हल्ला केला तर या दोन्ही देशांना हिजबुल्लाहकडून जोरदार प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी कासेमने दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलला लेबेनॉनवर निर्बंध टाकून हल्ले चढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण हिजबुल्लाह त्यांच्या मार्गातील मोठा अडसर असल्याचा दावा कासेमने केला होता.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)