Breaking News

अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन-जपान द्विपक्षीय सहकार्याची नवी सुरुवात

टोकिओ – चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी रविवारी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह जपानमध्ये दाखल झाले. तब्बल नऊ वर्षांनंतर चीनचे परराष्ट्रमंत्री द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करण्यासाठी जपानमध्ये दाखल होत असल्याने ही भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे ट्रम्प यांच्याबरोबरील चर्चेसाठी बुधवारी अमेरिका दौर्‍यावर दाखल होत असतानाच चीन पुढे के लेला सहकार्याचा हात लक्ष वेधून घेणारा ठरतो.

२०१० साली चीन व जपानमध्ये द्विपक्षीय व आर्थिक सहकार्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. त्यानंतर ईस्ट चायना सीमधील ‘सेन्काकू आयलंड’ आणि दुसर्‍या महायुद्धाशी निगडित घटनांवरील वादामुळे दोन देशांमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला होता.

त्यातच उत्तर कोरियातील अण्वस्त्रचाचण्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या हस्तक्षेपाला जपानने दिलेले समर्थन आणि ‘साऊथ चायना सी’मध्ये चीनला रोखण्यासाठीच्या योजनेतील जपानचा सहभाग, यामुळे चीन व जपानमधील वाद टोकाला जाऊन पोहोचला होता. चीनने लष्करी खर्चात केलेली वाढ, ‘साऊथ चायना सी’मध्ये वाढत्या लष्करीकरणासाठी सुरू केलेल्या हालचाली व ‘ईस्ट चायना सी’मधील ‘सेन्काकू आयलंड’च्या भागात चीनकडून सुरू असलेली घुसखोरी यामुळे त्यात अधिकच भर पडली होती.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाच्या दिशेने घेतलेले निर्णय व उत्तर कोरियाबाबत अमेरिकेने बदललेले धोरण, या गोष्टींनी चीन व जपानला नव्या सुरुवातीसाठी एकत्र आणण्यात भूमिका बजावल्याचे दिसते. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी रविवारी तब्बल चार तास जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कानो यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारी दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांमध्ये काही तास द्विपक्षीय संबंधांच्या मुद्यावर चर्चा झाली.

या चर्चेत दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्याची नवी सुरुवात करण्यावर एकमत दर्शविले. त्याचवेळी व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, यावरही दोन्ही देशांनी एक समान भूमिका घेतल्याची माहिती संबंधित नेत्यांनी दिली. ही चर्चा द्विपक्षीय संबंधांसाठी उचलण्यात आलेले मोठे पाऊल असून आम्ही आर्थिक सहकार्य विकसित करण्यासाठीही आशादायी आहोत, अशी प्रतिक्रिया जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांची भेट घेतली. यावेळी जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांनी, उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रबंदीच्या मुद्यावर चीनने सहकार्य करावे अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जपानचे पंतप्रधान येत्या ४८ तासात अमेरिका दौर्‍यावर दाखल होत असतानाच अशा स्वरूपाची मागणी पुढे येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

English  हिंदी