Breaking News

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची अधिकृत घोषणा, अमेरिकेच्या ३४ अब्ज डॉलर्स इतक्या आयातीवर चीनने कर लादले

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ६०० हून अधिक उत्पादनांच्या आयातीवर कर वाढविण्याची घोषणा करून चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणार्‍या ३४ अब्ज डॉलर्स मूल्याच्या उत्पादनांना याचा फटका बसणार आहे. अमेरिकेतून होणार्‍या आणखी १६ अब्ज डॉलर्सच्या आयातीवर कराची घोषणा नंतर करण्यात येईल, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले. यामुळे अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाची अधिकृत पातळीवर घोषणा झाल्याचे दिसत आहे.

us-china trade warचीनने प्रत्युत्तरादाखल कारवाई केल्यास अमेरिका नवे कर लादेल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिली होती. ही धमकी देण्यापूर्वी, चीनमधून आयात केल्या जाणार्‍या सुमारे ५० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर अमेरिकेने २५ टक्के इतका कर लादल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. चीनकडून होणारी अमेरिकी तंत्रज्ञानाची चोरी व व्यापारातील गैरव्यवहार यांना लक्ष्य करण्यासाठी चिनी आयातीवर कर लादण्यात येत असल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला होता. अमेरिका व चीनमधील व्यापारात समतोल आणण्यासाठी हे करण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी बजावले होते.

अमेरिकेच्या या घोषणेवर चीनने खरमरीत प्रतिक्रिया देऊन अमेरिकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, चीनने तत्काळ अमेरिकेच्या आयातीवर अतिरिक्त कर लादत असल्याचे जाहीर केले. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले. ‘अमेरिकेने चीनचा विरोध व आवाहनाकडे दुर्लक्ष करून जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन होईल, असे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय चीनचे अधिकार व हितसंबंध यांना धक्का देणारे असून चीनच्या व्यापारी सुरक्षेला धोका पोहोचविणारे आहेत, असा आरोप चीनने यावेळी केला.

‘अमेरिकेतून आयात होणार्‍या ३४ अब्ज डॉलर्स मूल्याच्या आयातीवर सहा जुलैपासून अतिरिक्त कर लागू होतील. यात प्रामुख्याने कृषी उत्पादनांचा समावेश असेल. इंधन व इतर उत्पादनांच्या १६ अब्ज डॉलर्स मूल्याच्या आयातीवरील करांची घोषणा नंतर जाहीर करण्यात येईल’, अशी माहिती चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दिली. शुक्रवारी करण्यात आलेल्या घोषणेत अमेरिकेतून आयात होणार्‍या ५४५ उत्पादनांचा समावेश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

चीनने अमेरिकेविरोधात व्यापारी करांची घोषणा करण्याची गेल्या तीन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात चीनने अमेरिकेच्या तब्बल १२८ उत्पादनांवर कर लादण्याची घोषणा केली होती. त्यावेळी चीनने अमेरिकेवर लादलेल्या करांमध्ये ‘अ‍ॅल्युमिनिअम स्क्रॅप’, ‘मांसाहारी उत्पादने’ व इतर महत्त्वाच्या उत्पादनांवर तब्बल २५ टक्के, तर फळे व इतर कृषी उत्पादनांवर सुमारे १५ टक्के कर लादण्यात आला होता.

मात्र या कारवाईनंतर चीन व अमेरिकेदरम्यान झालेल्या चर्चेत पुढे अशा स्वरूपाची कारवाई टाळण्यावर एकमत झाले होते. पण शुक्रवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केलेली घोषणा व त्यावर चीनने दिलेले प्रत्युत्तर यामुळे आता अमेरिका व चीनमध्ये अधिकृतरित्या व्यापारयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info