मॅक्रॉन यांच्यासारख्या घमेंडखोर राष्ट्राध्यक्षांमुळे फ्रान्स इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका – इटलीच्या प्रमुख नेत्यांकडून इशारा

मॅक्रॉन यांच्यासारख्या घमेंडखोर राष्ट्राध्यक्षांमुळे फ्रान्स इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका – इटलीच्या प्रमुख नेत्यांकडून इशारा

मॅक्रॉनरोम/पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन घमेंडखोर राष्ट्राध्यक्ष असून  त्यांच्यामुळे निर्वासितांच्या संकटाच्या मुद्यावर फ्रान्स हा इटलीचा पहिल्या क्रमाकांचा शत्रू बनण्याचा धोका आहे, असा इशारा इटलीच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. मॅक्रॉन यांनी युरोपमध्ये २०१५ सालाप्रमाणे निर्वासितांची समस्या राहिली नसून सध्याची स्थिती राजकीय संकटाचा भाग असल्याचे वक्तव्य केले होते.  इटलीचे उपपंतप्रधान ‘लुईगी डि मेओ’ व अंतर्गत सुरक्षामंत्री ‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ या दोन्ही नेत्यांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांचा समाचार घेऊन आक्रमक प्रत्युत्तर दिले.

रविवारी ब्रुसेल्समध्ये निर्वासितांच्या मुद्यावर ‘मिनी समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी निर्वासितांच्या समस्येबाबत आपली भूमिका मांडताना इटलीला लक्ष्य केले. ‘युरोपमध्ये सध्याची स्थिती २०१५ साली उद्भवलेल्या निर्वासितांच्या संकटाप्रमाणे नाही. इटलीसारख्या देशामध्ये गेल्या वर्षी निर्वासितांचे लोंढे ज्या प्रमाणात धडकत होते, ते प्रमाण यावर्षी घटले आहे. सध्या निर्वासितांच्या मुद्यावरून निर्माण झालेले संकट राजकीय आहे आणि ते निर्वासितांच्या युरोपमधील हालचालींशी निगडित राहिले आहे’, असा दावा मॅक्रॉन यांनी केला.

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर इटलीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली. इटलीचे उपपंतप्रधान ‘लुईगी डि मेओ’ यांनी मॅक्रॉन यांना थेट लक्ष्य करून त्यांचे विधान ते वास्तवापासून दूर असल्याचे दाखवून देणारे आहे, अशा शब्दात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना फटकारले. ‘इटलीवर आजही निर्वासितांचा लोंढ्यांचा मोठा दबाव आहे. यासाठी फ्रान्सच जबाबदार असून हा देश त्यांच्या सीमेवरून निर्वासितांना माघारी पाठवितो आहे. मॅक्रॉन यांच्या कृतीमुळे निर्वासितांच्या मुद्यावर फ्रान्स हा इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका निर्माण झाला आहे’, अशा शब्दात ‘लुईगी डि मेओ’ यांनी बजावले.

मॅक्रॉनइटलीचे अंतर्गत सुरक्षामंत्री ‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ यांनीही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘फ्रान्सचे घमेंडखोर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासाठी निर्वासितांचे लोंढे ही कदाचित समस्या वाटत नसेल. तसेच असेल तर त्यांनी इटलीचा अपमान करणे थांबवून इटली व फ्रान्सच्या सीमेवरील व्हेंटिमिग्लिआमधून निर्वासितांना फ्रान्समध्ये घ्यावे आणि फ्रान्सची बंदरे निर्वासितांसाठी खुली करण्याचे औदार्य दाखवावे’, असा खरमरीत इशारा ‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ यांनी दिला.

‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ यांनी गेल्या चार वर्षात इटलीत सहा लाखांहून अधिक निर्वासित आल्याचे सांगून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर तब्बल पाच अब्ज युरोचा बोजा पडल्याचा दावाही केला आहे. 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info