Breaking News

सिरियाच्या अस्साद राजवट व बंडखोरांमधील चर्चा फिस्कटल्यानंतर रशियाचे इस्रायलच्या गोलानजवळ ६०० हल्ले – इस्रायलकडून भीषण परिणामांचा इशारा

दमास्कस/जेरूसलेम – इस्रायलच्या गोलान सीमेजवळील सिरियन बंडखोरांबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्याचे जाहीर करून सिरिया व रशियाने इथल्या बंडखोरांच्या ठिकाणांवर ६०० हून अधिक हल्ले चढविले. इस्रायलच्या गोलान सीमेपासून अवघ्या दहा किलोमीटर इतक्या अंतरावर करण्यात आलेल्या या हल्ल्यांवर इस्रायलने तीव्र प्रतिक्रिया दिली. गोलान टेकड्यांच्या सीमाभागाबाबत इस्रायल आणि सिरियामध्ये १९७४ साली करार झाला होता. सिरियाने त्याचे उल्लंघन केले तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असे इस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री गिलाड एर्दान यांनी बजावले आहे. इस्रायलचा हा इशारा सिरियाबरोबरच रशियासाठीही असल्याचे संकेत मिळत आहेत.

अस्साद, चर्चा, गिलाड एर्दान, इस्रायल, गोलान, हल्ले, सिरिया, अमेरीकासिरियाच्या दक्षिणेकडील ‘दारा’ भागात तळ ठोकलेले बंडखोर सिरियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचा दावा करून १९ जून पासून अस्साद राजवटीने या भागात लष्करी मोहीम छेडली होती. पण अमेरिकेने सिरियन लष्कराच्या या कारवाईवर आक्षेप घेतला होता. वर्षभरापूर्वी केलेल्या संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. तसेच सिरियन लष्कराच्या या कारवाईसाठी रशिया जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता.

यानंतर रशियाने अस्साद राजवट व सिरियन बंडखोरांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. गुरुवारी या वाटाघाटी फिस्कटल्याची घोषणा रशिया व सिरियाने केली. त्याचबरोबर रशिया व सिरियन लष्कराने रात्रभर ‘दारा’मधील बंडखोरांच्या ठिकाणांवर सहाशेहून अधिक रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि मॉर्टर्स डागले. या कारवाईत रशियन लढाऊ विमाने आणि सिरियन रणगाड्यांनी सहभाग घेतला होता. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीची माहिती उघड झालेली नाही. पण लष्कराच्या या हल्ल्यांच्या भीतीने तीन लाखाहून अधिक सिरियन नागरिकांनी याआधीच ‘दारा’ सोडून पलायन केले आहे.

दरम्यान, रशिया व सिरियन लष्कराचे ‘दारा’मधील हल्ले हळूहळू इस्रायलच्या गोलान सीमेजवळ पोहोचत असल्याचा आरोप इस्रायली यंत्रणा करीत आहेत. गोलान सीमेपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर रशिया व सिरियाचे हे हल्ले सुरू असून यामुळे गोलान टेकड्यांबाबत केलेला ऐतिहासिक करार संकटात सापडू शकतो, असा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत.

१९७४ साली इस्रायल आणि सिरियामध्ये झालेल्या करारानुसार, इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या सीमारेषेपासून १० किलोमीटर अंतरावर सिरियाचे सैन्य तैनात करता येईल. इथल्या सिरियन सैनिकांची संख्या ६००० पेक्षा जास्त असू शकत नाही. तसेच गोलान सीमेजवळ सिरियन लष्कराचे ७५ हून अधिक रणगाडे किंवा लष्करी वाहने तैनात नसतील, अशा अटी या करारात होत्या. पण सिरियन लष्कराचे गोलानजवळील हल्ले तसेच या भागातील सिरियन लष्कराबरोबर इराणचे सैनिक व हिजबुल्लाहच्या समर्थकांची वाढती संख्या या कराराचे उल्लंघन ठरू शकते.

या कराराचे उल्लंघन झाले किंवा गोलान सीमेजवळ अस्थैर्य निर्माण झाले तर इस्रायल सिरियावर कारवाई करील, असा इशारा इस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री एर्दान यांनी केला. गोलान सीमेजवळील सिरियन सैनिकांनाही लक्ष्य करण्यात येईल, असे इस्रायली लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांनी धमकावले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info