Breaking News

सिरियावरून रशियाने दिलेल्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘एफ-35’ने सज्ज अमेरिकी युद्धनौका आखातात दाखल

सिरियाच्या किनारपट्टीजवळ 30 युद्धनौकांचा ताफा तैनात करून अमेरिकी लष्करी ठिकाणांवर हल्ले चढविण्याची धमकी देणार्‍या रशियाला अमेरिकेकडून त्याच भाषेत उत्तर मिळत आहे. अमेरिकेच्या हवाईदलातील अतिप्रगत स्टेल्थ लढाऊ विमान ‘एफ-35बी’ने सज्ज असलेली युद्धनौका आखातात दाखल झाली आहे. अस्साद राजवटीने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास सिरियावर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेची ही विमाने या क्षेत्रात दाखल झाल्याचा दावा केला जातो.

गेल्या महिन्याभरात सिरियात मोठे बदल घडले आहेत. रशियाने इदलिबमधील कारवाई तसेच सिरियन लष्कराच्या सहाय्यासाठी 30 युद्धनौका व पाणबुड्यांचा ताफा भूमध्य समुद्रात रवाना केला आहे. तसेच रशियन नौदलाच्या मरिन्सने काही दिवसांपूर्वी सिरियाच्या किनारपट्टीजवळ युद्धसरावही केला होता. गेल्या काही दिवसांपासून रशिया तसेच सिरियन लष्कराने ‘इदलिब’वर हल्ले सुरू केले आहेत. पुढच्या काळात रशिया हे हल्ले अधिकच तीव्र करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अमेरिकेच्या दोन युद्धनौका आणि पाणबुड्या भूमध्य समुद्रात सिरियावर हल्ल्यासाठी आधीपासूनच तैनात केलेल्या आहेत. इदलिबमध्ये सिरियन लष्कराने रासायनिक हल्ला चढविला तर अमेरिका व मित्रदेश अस्साद राजवटीवर हल्ला चढवल्यावाचून राहणार नाही, असा इशारा अमेरिकेने दिला होता. मात्र अमेरिकेने अस्साद राजवटीवर हल्ला चढविला तर सिरियातील अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी रशियाने दिली होती. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत पातळीवर तसा इशारा दिला होता. रशियापाठोपाठ इराणने देखील अमेरिकेला धमकावले होते.

या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने ‘युएसएस एसेक्स’ ही सर्वात जलद अ‍ॅम्फिबियस युद्धनौका सिरियासाठी रवाना केली. ‘युएसएस एसेक्स’ युद्धनौका सुमारे दोन हजार मरिन्स, 20 ‘एफ-35बी’ स्टेल्थ लढाऊ विमानांसह हॅरिअर लढाऊ विमाने, वायपर तसेच ऑस्प्री हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यासह येथील सागरी क्षेत्रात दाखल झाली?आहे. सध्या ही युद्धनौका ‘सुएझ कालव्या’त असून या सागरी क्षेत्रातून ‘युएसएस एसेक्स’ सिरियातील घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती अमेरिकी नौदलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

इस्रायलजवळच्या सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या ‘युएसएस एसेक्स’वरील ‘एफ-35बी’ स्टेल्थ लढाऊ विमाने अवघ्या काही मिनिटांत सिरियावर हल्ले चढवू शकतात. तसेच आवश्यकता निर्माण झाली तर ‘युएसएस एसेक्स’ ही इतर विमानवाहू युद्धनौकांच्या तुलनेत अधिक वेगाने सिरियाच्या सागरी क्षेत्रात दाखल होऊ शकते, असा दावा अमेरिकी अधिकारी करीत आहेत. त्यामुळे सध्या ‘युएसएस एसेक्स’ सुएझ कालव्यातून तर टॉमाहोका क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या अमेरिकी नौदलाच्या दोन युद्धनौका आधीपासूनच भूमध्य समुद्रात तैनात आहेत. त्यामुळे अमेरिकेने दोन बाजूने सिरियावर हल्ल्याची जय्यत तयारी केल्याचे दिसते.

दरम्यान, अस्साद राजवटीवर हल्ले चढविताना रशियाबरोबर कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको म्हणून रशियन यंत्रणेच्या संपर्कात राहणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. पण अमेरिकेने अस्साद राजवटीवर हल्ले चढविल्यास गंभीर परिणाम होतील, असे बजावून रशिया आपण याबाबत तडजोड करणार नाही, असा संदेश देत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात सिरियात नक्की काय घडेल, याचा अंदाज वर्तविणे अवघड बनत चालले आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info