ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून माघार घोषित केली नाही – व्हाईट हाऊसचा दावा

ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून माघार घोषित केली नाही – व्हाईट हाऊसचा दावा

वॉशिंग्टन -‘राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा विचार केलेला नाही’, अशी घोषणा व्हाईट हाऊसने केली. अफगाणिस्तानात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी युद्धावर प्रश्‍न उपस्थित करून ट्रम्प यांनी सैन्यमाघारीचे आदेश दिल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. पण व्हाईट हाऊसने असे काही घडलेच नसल्याचे सांगून माध्यमांनी खोट्या बातम्या दिल्याची टीका केली आहे.

व्हाईट हाऊस,सैन्यमाघार, डोनाल्ड ट्रम्प, सैनिक, तालिबानविरोधी कारवाई, अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे सिरियातील सैन्यमाघारीची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेतील ‘ब्लुमबर्ग’ या वृत्तसंस्थेने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून तातडीने सैन्यमाघार घेण्याची सूचना संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ला दिल्याचे प्रसिद्ध केले होते. सध्या अफगाणिस्तानात तैनात असलेल्या १४ हजार सैनिकांमधील सात हजार सैनिकांना माघारी बोलाविण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला होता.

इतर वृत्तसंस्थांनीही ट्रम्प अफगाणिस्तानातून सैन्यमाघार?घेणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. यासाठी ट्रम्प प्रशासन तसेच पेंटॅगॉनमधील काही अधिकार्‍यांचा हवालाही या माध्यमांनी दिला होता. संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांच्या राजीनाम्यामागे अफगाणिस्तानातील सैन्यमाघार असल्याचा दावा माध्यमांनी केला होता. त्यानंतर अमेरिकन कॉंग्रेसमधून ट्रम्प यांच्यावर टीकाही झाली होती. पण व्हाईट हाऊसने शनिवारी ‘ब्लुमबर्ग’ या वृत्तसंस्थेला पाठविलेल्या ‘ई-मेल’मध्ये या सैन्यमाघारीविषयी छापलेल्या बातमीचा समाचार घेतला.

‘अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यकपातीबाबत ट्रम्प यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी संरक्षण मंत्रालयालादेखील अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांना माघारी बोलाविण्याचे निर्देश दिलेले नाहीत’, अशा स्पष्ट शब्दात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते ‘गॅरेट माक्वीज्’ यांनी या वृत्तसंस्थेला फटकारले. याआधी अफगाणिस्तानातील अमेरिका तसेच नाटो लष्कराचे प्रमुख ‘जनरल स्कॉट मिलर’ यांनी देखील अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबत आपल्याला सूचना मिळाली नसल्याचे म्हटले होते.

अमेरिकेतील दहशतवादविरोधी मोहीम अर्धवट सोडून माघार घेतल्यास आणखी एक ९/११ घडेल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जोसेफ डनफोर्ड यांनी याआधीच दिला होता. त्याचबरोबर ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील तालिबानविरोधी कारवाई आक्रमक करून ड्रोन्स व लढाऊ विमानांचे हल्ले तीव्र केले होते. पण ही कारवाई करीत असताना अफगाणिस्तानच्या सरकारने तालिबानमधील फुटीर गटांसोबत सुरू केलेल्या शांतीचर्चेलाही?अमेरिकेने पाठिंबा दिला होता. अमेरिकेचे अफगाणिस्तानातील विशेषदूत झाल्मे खलिलझाद यांनी यासाठी तालिबानच्या वरिष्ठ कमांडरसोबत चर्चाही केली होती.

अमेरिका सैन्यमाघारीच्या बातम्या सोडून देईल व आपल्याला अपेेक्षित असलेले परिणाम साधेल. पण प्रत्यक्षात अमेरिका अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय कधीही घेणार नाही, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानसारख्या देशावर नियंत्रण ठेवून अमेरिका एकाच वेळी अनेक गोष्टी साधत आहे. रशिया, इराण, चीन व पाकिस्तान या देशांना सीमा भिडलेल्या अफगाणिस्तानात आपले सैन्य तैनात ठेवणे हा अमेरिकेच्या हितसंबंधांचा भाग ठरतो, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info