Breaking News

२०१६ सालच्या सार्वमतानुसार ब्रिटनने युरोपिय महासंघातून बाहेर पडावे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन

वॉशिंग्टन/लंडन – ‘ब्रेक्झिट ही ब्रिटनला एक मजबूत व स्वतंत्र राष्ट्र बनविणारी उत्तम संधी आहे. त्यामुळे २०१६ साली झालेल्या सार्वमतानुसार ब्रिटनने युरोपिय महासंघातून बाहेर पडावे, ही अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिका ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने ठामपणे उभी असल्याचे संकेत दिले. सोमवारपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटन दौरा सुरू होत असून या पार्श्‍वभूमीवर बोल्टन यांचे हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच ‘ब्रेक्झिट’चे जोरदार समर्थन केले आहे. ‘ब्रेक्झिट’साठी महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रिटीश नेते निगेल फॅराज ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात. फॅराज यांनी स्वतंत्ररित्या ट्रम्प यांची भेटही घेतली आहे. ‘ब्रेक्झिट’च्या सार्वमतानंतर ट्रम्प यांनी ब्रिटीश जनतेने घेतलेल्या निर्णयाची आवर्जून नोंद घेतली होती. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प यांनी सातत्याने अमेरिका महासंघातून बाहेर पडणार्‍या ब्रिटनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल, असे वारंवार आश्‍वासनही दिले आहे.

त्याचवेळी युरोपिय महासंघाबरोबरील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे संबंध फारसे चांगले नसल्याचे गेल्या दोन वर्षात दिसून आले आहे. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर युरोपिय महासंघाबरोबरील अमेरिकेची व्यापारी चर्चा रद्द केली होती. त्याचवेळी संरक्षणखर्चाच्या मुद्यावर महासंघ व सदस्य देश अपेक्षित भूमिका घेत नसल्याचा ठपकाही ठेवला होता. युरोपिय महासंघाने निर्वासितांच्या मुद्यावर स्वीकारलेल्या धोरणावर ट्रम्प यांनी सातत्याने टीकास्त्र सोडले होते. या मुद्यावर महासंघाला विरोध करणार्‍या युरोपिय देश व नेत्यांना ट्रम्प यांनी जबरदस्त समर्थन दिले होते.

गेल्या वर्षी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी महासंघाबरोबर केलेल्या ‘ब्रेक्झिट’ करारावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘ब्रिटन सरकारने युरोपिय महासंघाबरोबर केलेला ब्रेक्झिटचा करार हा सध्या तरी युरोपिय महासंघाला फायद्याचा ठरेल, असा करार दिसतो आहे. हाच करार कायम राहिला तर बहुधा ब्रिटन अमेरिकेबरोबर व्यापारी करार करु शकेल, असे वाटत नाही. ही फारशी चांगली गोष्ट असणार नाही’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महासंघापुढे झुकती भूमिका घेणार्‍या मे यांना लक्ष्य केले होते.

या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांच्या ब्रिटन दौर्‍यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी मांडलेली अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरते. ‘ब्रेक्झिटनंतर एक स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभाव नक्कीच वाढणार आहे. याचा लाभ नाटोसारख्या संघटनेलाही होईल. एक स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनची नाटोमधील भूमिका नाटोला अधिक प्रभावी करणारी ठरेल’, असा दावा बोल्टन यांनी केला. यावेळी बोल्टन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करून भावी पंतप्रधानांना ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया पूर्ण करून अमेरिकेबरोबर व्यापारी चर्चा सुरू करण्यास प्राधान्य द्यावे लागेल, असेही बजावले.

 

पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘ब्रेक्झिट’च्याच मुद्यावर राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असून ७ जूनला मे अधिकृतरित्या राजीनामा सादर करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी नव्या नेत्याची निवड होणार असून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ‘बोरिस जॉन्सन’ यांना उघड पाठिंबा देऊन खळबळ उडवली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info