जनतेच्या उग्र आंदोलनानंतर हॉंगकॉंगमधील वादग्रस्त विधेयक मागे माघारीला चीनचेही समर्थन

जनतेच्या उग्र आंदोलनानंतर हॉंगकॉंगमधील वादग्रस्त विधेयक मागे माघारीला चीनचेही समर्थन

हॉंगकॉंग, दि. १५ (वृत्तसंस्था) – हॉंगकॉंगच्या जनतेने केलेल्या उग्र व व्यापक आंदोलनानंतर, हॉंगकॉंगमधील गुन्हेगारांना चीनकडे सुपूर्द करणारे  वादग्रस्त विधेयक स्थानिक प्रशासनाने मागे घेतले आहे. हॉंगकॉंगच्या प्रशासकीय प्रमुख कॅरी लॅम यांनी माघारीची घोषणा करताना त्यावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. लॅम यांच्या या घोषणेनंतर काही तासातच चीननेही या मुद्यावर आपली प्रतिक्रिया जाहीर केली असून सदर निर्णयाला चीनचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. यामुळे हॉंगकॉंगमध्ये हस्तक्षेपाचा चीनचा प्रयत्न सध्या उधळला गेला असला, तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू शकतात, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

विधेयक, माघारीची घोषणा, कॅरी लॅम, प्रशासकीय व्यवस्था, निदर्शन, हॉंगकॉंग, चीन, अमेरिका

हॉंगकॉंग हा चीनचा भाग असला तरी तिथली प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे वेगळी आहे. चीन ही व्यवस्था नष्ट करून हॉंगकॉंगला आपल्या कम्युनिस्ट राजवटीच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची भीती हॉंगकॉंगची जनता व्यक्त करीत आहे.  हॉंगकॉंगच्या प्रशासनाने सादर केलेल्या प्रत्यार्पण विधेयकाच्या माध्यमातून स्थानिक जनतेला वाटणारी भीती खरी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी हॉंगकॉंगची जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात हॉंगकॉंगमध्ये निघालेल्या ‘मिलियन मार्च’पाठोपाठ सलग निदर्शनांना सुरुवात झाली. व्यापक आंदोलनाचा भाग असलेली ही निदर्शने मोडून काढण्यासाठी पोलिसांनी निदर्शकांवर आक्रमक कारवाई केली. त्याचेही तीव्र पडसाद हॉंगकॉंगसह संपूर्ण जगभरात उमटले. अमेरिकेने या निदर्शकांवर सुरू असलेल्या हिंसक कारवाईवर गंभीर चिंता व्यक्त केली तर ब्रिटनमधून हस्तक्षेपाची मागणी होऊ लागली. चीनच्या सरकारी माध्यमांनी या निदर्शकांच्या मागे पाश्‍चिमात्यांचा कट असल्याचा आरोप सुरू केला होता.

मात्र हॉंगकॉंगचे चीनधर्जिणे प्रशासन व चीनच्या राजवटीकडून चाललेले प्रयत्न अखेर उधळले गेले असून स्थानिक प्रशासनाला माघार घ्यावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही माघार घेत असतानाही प्रशासकीय प्रमुख लॅम यांनी पोलिसी कारवाईचे केलेले समर्थन चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील काळातही हॉंगकॉंगमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, असे संकेत मिळत आहेत.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info