अमेरिकेचे ‘एफ-३५’ लष्करासाठी हवेतील रडारचे काम करणार

अमेरिकेचे ‘एफ-३५’ लष्करासाठी हवेतील रडारचे काम करणार

वॉशिंग्टन, दि. १० (वृत्तसंस्था) – रशिया किंवा चीनच्या अतिप्रगत लढाऊ विमानांना न जमलेली कामगिरी अमेरिकेच्या ‘एफ-३५’ या विमानाने करून दाखविली आहे. अमेरिकन लष्कराच्या रडार यंत्रणेला गुंगारा देणार्‍या शत्रूच्या क्षेपणास्त्राची माहिती  वेळेत ‘मिसाईल कमांड सिस्टिम’ला पुरविण्याची कामगिरी ‘एफ-३५’ने करून दाखविली. कॅलिफोर्निया येथे पार पडलेल्या एका सरावात ‘एफ-३५’ने लष्करासाठी हवेतील रडारचे काम केले. यामुळे लष्करी तळावरील रडार यंत्रणेच्या पकडीत न येणारी शत्रूची क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या स्टेल्थ ‘एफ-३५’च्या नजरेतून सुटू शकणार नाहीत, असा दावा अमेरिकन अधिकारी व संबंधित कंपन्या करीत आहेत.

गेली काही वर्षे अमेरिकेच्या तीनही दलांच्या सेवेत असलेले ‘एफ-३५’ अतिप्रगत आणि ‘फिफ्थ जनरेशन’ लढाऊ विमान आहे. रडारला गुंगारा देणार्‍या ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाने सज्ज असलेले ‘एफ-३५’ विमान ‘मिसाईल किलर’ म्हणूनही ओळखले जाते. असे असले तरी गेल्या तीन वर्षांपासून सदर अतिप्रगत लढाऊ विमान अधिकाधिक अवघड मोहिमांसाठी सज्ज करण्यासाठी ‘लॉकहीड मार्टिन’ या कंपनीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महिन्याभरापूर्वी कॅलिफोर्निया येथील ‘पामडेल’ लष्करी तळावर आयोजित केलेल्या ‘ऑरेंज फ्लॅग’ युद्धसरावात ‘एफ-३५’ची चाचणी पार पडली.

आतापर्यंत लष्करी तळावरील रडारमधून मिळणारी माहिती ‘एफ-३५’ला पुरविण्यात येत होती. पण ‘ऑरेंज फ्लॅग’ युद्धसरावात पहिल्यांदाच ‘एफ-३५’ विमानाने अमेरिकन लष्कराच्या ‘‘इंटिग्रेटेड एअर मिसाईल डिफेन्स (आयएएमडी) बॅटल कमांड सिस्टिम (आयबीसीएस)’’ साठी शत्रूने प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्राची माहिती प्रसारित केली. ‘एफ-३५’ने पुरविलेल्या या माहितीमुळे शत्रूचे क्षेपणास्त्र वेळेआधीच भेदण्यात यश मिळाल्याचे ‘लॉकहीड मार्टिन’ने आपल्या पत्रकात म्हटले आहे. हवेत उड्डाण करणार्‍या ‘एफ-३५’ विमानाने लष्करासाठी ‘रडार’प्रमाणे काम केल्याचा दावा अमेरिकन कंपनीने केला.

या युद्धसरावामुळे ‘एफ-३५’ विमानाच्या सामर्थ्यात भर पडल्याचे या युद्धसरावात सहभागी झालेल्या अमेरिकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत रडार यंत्रणांना चकविणार्‍या शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा माग काढणे अमेरिकन लष्कराच्या रडारना अवघड ठरत होते. पण ‘एफ-३५’ विमान अमेरिकी लष्करासाठी सेन्सर, रडार तसेच आवश्यकता निर्माण झाल्यास ‘मिसाईल किलर’चे देखील काम करू शकतो, हे या चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांपूर्वी ‘एफ-३५’ने अमेरिकी नौदलाच्या ‘एजिस’ या हवाई सुरक्षा यंत्रणेसाठी देखील अशीच चाचणी केली होती.

दरम्यान, ‘एफ-३५’ विमानाची ही चाचणी रशिया तसेच चीनसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही वर्षात रशिया व चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा वेग वाढविला असून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हे मोठे आव्हान असल्याचा इशारा अमेरिकी लष्करी अधिकारी तसेच विश्‍लेषक देत आहेत. या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला अत्याधुनिक रडार यंत्रणेची आवश्यकता असल्याचे दावेही करण्यात आले होते. पण ‘एफ-३५’च्या कामगिरीने रशिया व चीनच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांपासून असलेला धोका कमी झाल्याचे बोलले जाते.

हिंदी   English

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info