जेरूसलेम/तेहरान – अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी इराणने केलेला अणुकरार धोक्यात आला असून अमेरिकेने या करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सदर अणुकरारावर फ्रान्स व इराणमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेचे तपशील उघड झाले नसले तरी, ही चर्चा अपयशी ठरल्यास अमेरिका व इस्रायल मिळून इराणच्या तळांवर हल्ले चढवतील, असा दावा कुवैतच्या दैनिकाने केला होता. तसेच अमेरिका व इस्रायलने आधीपासूनच या हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र अमेरिका व इस्रायलने इराणवर हल्ले चढविलेच, तर ते या देशांना भलतेच महाग पडतील, अशी धमकी इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने दिली आहे.
बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असताना २०१५ साली अमेरिकेसह सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेले इतर देश व युरोपिय महासंघाने इराणबरोबर अणुकरार केला होता. या करारानुसार इराणने युरेनियमचे संवर्धन मर्यादित करण्याचे मान्य केले व याच्या मोबदल्यात इराणवरील निर्बंध शिथिल करण्याची तयारी पाश्चिमात्य देशांनी दाखविली होती. या अणुकरारावर इस्रायलने कडक शब्दात टीका केली होती. तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी उघडपणे या कराराच्या विरोधात भूमिका घेतली. इराणने आपला अणुकार्यक्रम नियंत्रित केलेला नाही. तसेच क्षेपणास्त्रांची निर्मिती व चाचणी करून इराणने अणुकराराचा भंग केला आहे, असा आरोप ट्रम्प प्रशासन करीत आहे.
यामुळे सदर करारात सहभागी झालेले इतर देश यासाठी आग्रही असले तरी अमेरिका इराणबरोबरील या करारातून माघार घेईल, अशी धमकी अमेरिकेने दिली होती. तर युरोपिय देश हा अणुकरार वाचविण्यासाठी आपल्या परिने प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी फ्रान्सने सदर करारावर इराणशी चर्चा सुरू केली होती. ही चर्चा पूर्ण झाली असली तरी याला यश मिळाले की ही चर्चा अपयशी ठरली, याची माहिती कुणीही उघड केलेली नाही. पण जर का ही चर्चा अपयशी ठरली, तर अमेरिका व इस्रायल मिळून इराणच्या आखाती देशांमधील तळांवर घणाघाती हल्ले चढवतील, असा दावा कुवैतच्या एका दैनिकाने केला आहे.
‘अल जरिदा’ नावाच्या या दैनिकाने अमेरिकी अधिकार्याचा हवाला देऊन फ्रान्स-इराण चर्चा अपयशी ठरल्यास ती आखाती देशांसाठी भयंकर आपत्ती ठरेल, असे बजावले. विशेषतः ज्या देशांमध्ये सध्या इराण सक्रिय आहे, अशा इराक, सिरिया व लेबेनॉन या देशांमध्ये अमेरिका व इस्रायल हल्ले चढविल, असे ‘अल जरिदा’ने आपल्या बातमीत म्हटले आहे. आखातात या बातमीची चर्चा सुरू असतानाच, इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने त्यावर जहाल प्रतिक्रिया दिली.
इस्रायल व अमेरिकेने इराणविरोधात संघर्ष छेडल्यास त्यांना तो महागात पडेल, अशी धमकी इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल घोलम अली रशिद यांनी दिली. मेजर रशिद इराणमधील अत्यंत महत्त्वाची ‘मिलिटरी ऑपरेशन कमांड’ म्हणून ओळखण्यात येणार्या ‘खताम अल अन्बिआ’चे प्रमुख आहेत.
‘सध्या इराणचे प्रादेशिक सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढले असून इराणविरोधात संघर्षाचा विचार करणे अधिकच अवघड झाले आहे. जर कोणी संघर्ष छेडलाच तर त्यांना अपरिमित हानी सोसावी लागेल. इस्रायलला याची पुरती कल्पना असल्याने अद्याप इस्रायलने इराणच्या विरोधात कारवाया केलेल्या नाहीत’, असा दावा मेजर रशिद यांनी केला आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)