वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांना सिरियाच्या सत्तेवरून खाली खेचण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने जोरदार तयारी केली आहे. अस्सादविरोधी मोहिमेसाठी सिरियामध्ये किमान ६० हजार सैनिक तैनात करावे लागणार असून त्यांच्यासाठी ५० कोटी डॉलर्सचा निधी आवश्यक असल्याचे पेंटॅगॉनने म्हटले आहे. अमेरिकन कॉंग्रेसने पेंटॅगॉनचा हा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे.
महिन्याभरापूर्वी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ने अमेरिकन कॉंग्रेससमोर ६८६ अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये सिरियातील संघर्षासाठी पेंटॅगॉनने ५० कोटी डॉलर्सच्या निधीचा समावेश आहे. गेल्या वर्षी पेंटॅगॉनने सिरियातील ‘आयएस’विरोधी संघर्षासाठी ३० कोटी डॉलर्सचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर अमेरिका व मित्रदेशांनी सिरियाच्या उत्तरेकडील भागात केलेल्या कारवाईत ‘आयएस’ला पिटाळून लावले होते. त्यामुळे पेंटॅगॉनच्या सिरियाविषयक प्रस्तावात कपात होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण पेंटॅगॉनने वाढीव निधीची मागणी केली असून कॉंग्रेसने हा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील जोरदार प्रयत्न करीत आहेत.
सिरियातील ‘वेटेड सिरियन अपोझिशन’ (वीएसओ) या अस्सादविरोधी बंडखोरांसाठी पेंटॅगॉनने ही तरतूद सुचविल्याचा दावा केला जातो. सिरियामध्ये सुमारे ६० ते ६५ हजार अस्सादविरोधी सैनिक तैनात करण्याची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची योजना असल्याचे बोलले जाते. यापैकी सुमारे ३० हजार सैनिक लष्करी संघर्षासाठी तर ३५ हजार सैनिक अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात असतील, अशी माहिती एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. या सैनिकांसाठी प्रगत शस्त्रसाठा आणि लष्करी वाहनांसाठी वाढीव मागणी सदर प्रस्तावात करण्यात आली आहे. पेंटॅगॉनने सदर वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
सिरियातील परिस्थिती अधिकच चिघळत चालली असून ‘ईस्टर्न घौता’तील दोन आठवड्यांच्या संघर्षात एक हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. सिरियातील अस्साद राजवट व रशियन लष्कर ‘ईस्टर्न घौता’वर सलग हल्ले चढवीत असल्याचा दावा केला जातो. त्याचवेळी सिरियन राजवटीकडून आपल्या जनतेवर रासायनिक हल्ले चढविले जात असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे.
ओमानच्या दौर्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी सिरियातील रासायनिक हल्ल्यांसाठी अस्साद राजवट तसेच रशियाला जबाबदार धरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे अहवाल देखील रासायनिक हल्ल्यांसाठी सिरियन राजवटीकडे बोट दाखवत आहेत. तर रशियाने सिरियामध्ये २१० शस्त्रास्त्रांची चाचणी घेतल्याची घोषणा करून रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी रशियाला या आरोपांची पर्वा नसल्याचे दाखवून दिले आहे.