अमेरिकेने सिरियात हल्ले चढविल्यास रशिया अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करील – रशियाच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

अमेरिकेने सिरियात हल्ले चढविल्यास रशिया अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करील – रशियाच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

मॉस्को – रासायनिक हल्ल्यांचे खोटे आरोप करून अमेरिकेने सिरियन राजवटीवर हल्ला चढविला तर रशिया देखील सिरियातील अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले चढविल, असा इशारा रशियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल ‘वॅलेरी गेरासिमोव’ यांनी दिला. काही तासांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत ‘निक्की हॅले’ यांनी सिरियन लष्कराचे रासायनिक हल्ले थांबले नाही तर अमेरिका कारवाई करील, असे धमकावले होते. अमेरिकेच्या या इशार्‍यावर रशियाकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून सिरियन लष्कर ‘ईस्टर्न घौता’मध्ये करीत असलेल्या हल्ल्यांमध्ये हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. सिरियन राजवटीच्या दररोज सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे चार लाखाहून अधिक नागरिक ‘ईस्टर्न घौता’मध्ये अडकून पडले असून त्यांना मानवी सहाय्य देखील पुरविले जात नसल्याची टीका अमेरिका तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. त्याचबरोबर अस्साद राजवटीकडून ‘ईस्टर्न घौता’तील जनतेवर रासायनिक हल्ले चढविले जात असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. सिरियन राजवटीचे हे हल्ले संघर्षबंदीचे उल्लंघन करणारे असून रशियाने सदर हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रसंघाने केले होते.

पण यानंतरही सिरियन लष्कराकडून रासायनिक शस्त्रांचा वापर होत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी सोमवारी कठोर शब्दात रशियाला ठणकावले. यासाठी हॅले यांनी गेल्या वर्षी सिरियाच्या ‘खान शेखौन’ भागात अमेरिकेने चढविलेल्या हल्ल्यांची आठवण करून दिली. रशियाने सिरियन राजवटीच्या हल्ल्यांना रोखले नाही तर अमेरिका सिरियावर पुन्हा ‘खान शेखौन’च्या हल्ल्यांची पुनरावृत्ती करील, अशी धमकी हॅले यांनी दिली होती. तसेच सिरियन राजवटीच्या या हल्ल्यांसाठी हॅले यांनी रशियाला जबाबदार धरले होते.

रशियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल ‘गेरासिमोव’ यांनी अमेरिकेच्या या धमकीला प्रत्युत्तर दिले. ‘सिरियातील बंडखोर रासायनिक हल्ले चढविणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आपल्याकडे आहे. पण सिरियन राजवटीवर या रासायनिक हल्ल्यांचे खोटे आरोप करून अमेरिका सिरियावर हल्ले चढविण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळे सिरियातील आपल्या सैनिकांच्या आणि हितसंबंधितांची सुरक्षा धोक्यात आली तर रशिया अमेरिकी सैनिकांवर हल्ले चढविल’, असे जनरल गेरासिमोव यांनी बजावले आहे.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने रशियाचे हे आरोप धुडकावले आहेत. असे आरोप करून रशिया सिरियन राजवटीच्या दुष्कृत्यांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका पेंटॅगॉनने केली. दरम्यान, अमेरिकी सैनिकांवर हल्ले चढविण्याची धमकी देणारे रशियन संरक्षणदलप्रमुख गेरासिमोव आणि अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल जोसेफ डनफोर्ड यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र या चर्चेचे तपशील उघड होऊ शकलेले नाहीत.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)