न्यूयॉर्क – ‘रशिया केवळ ब्रिटनमध्ये विषप्रयोग करून थांबणार नाही. तर अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्येही रशिया असे रासायनिक हल्ले चढविल. इथे ज्यांचे प्रतिनिधी आहेत, त्या देशांमध्येही रशियाच्या रासायनिक शस्त्रांचा वापर होऊ शकतो’, अशा थेट शब्दात अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत निक्की हॅले यांनी रशियावर घणाघाती हल्ला चढविला. त्याचवेळी या प्रकरणात ब्रिटनला अमेरिकेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचेही हॅले यांनी घोषित केले.
ब्रिटनच्या सॅलिस्बरी भागात माजी हेराच्या हत्येचा प्रयत्न हा रशियानेच केलेला गुन्हा असल्याचा आरोप अमेरिकेने केला. यावेळी राजदूत हॅले यांनी सुरक्षा परिषदेला सिरियातील रासायनिक हल्ल्यांच्या मुद्यावर रशियाने घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली. सिरियातील रासायनिक हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या अस्साद राजवटीला रशियाने कायम पाठिशी घातले असल्याचे सांगून गेल्या वर्षात पाच वेळा रशियाने सिरियाच्या मुद्यावर नकाराधिकाराचा वापर केल्याचे हॅले यांनी सांगितले.
‘अमेरिका व पाश्चात्य देश रशियावर सातत्याने टीकास्त्र सोडतात, अशी तक्रार रशियाने नुकतीच केली होती. पण रशियाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मारण्यासाठी रासायनिक शस्त्रांचा वापर करणे थांबवले, सिरियात रासायनिक हल्ले करणार्या राजवटीला समर्थन देण्याचे नाकारले आणि रासायनिक शस्त्रांबाबत संबंधित यंत्रणांना पूर्ण माहिती देऊन सहकार्य केले, तर आम्ही त्यांच्यावर टीका करणे थांबवू’, असा टोलाही निक्की हॅले यांनी लगावला.
‘सुरक्षा परिषदेतील एक सदस्य देश दुसर्या सदस्याविरोधात कारवाया करीत असल्याचा दावा करून रशियाला त्यांच्या प्रत्येक गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारणे भाग पाडायला हवे’, अशी मागणी अमेरिकेच्या राजदूतांनी केली. अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेचे ब्रिटनने स्वागत केले आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघातील रशियन दूतांनी अमेरिकेचे आरोप नाकारले असून, आम्ही पूर्ण सहकार्य व माहिती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)