मॉस्को – रशियाने अण्वस्त्रवाहू ‘सॅटन 2’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे जाहीर केले. रशियाचे संरक्षण दलप्रमुख जनलर ‘वॅलेरी गेरासिमो’ यांनी या चाचणीची घोषणा केली आहे.
रशियन लष्कराच्या ताफ्यात असलेल्या ‘वोएवोड’ किंवा ‘सॅटन’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची मारक क्षमता 11 हजार किलोमीटरहून अधिक असल्याचा दावा केला जातो. आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले ‘सॅटन 2’ हे क्षेपणास्त्र सर्वात भेदक आणि विध्वंसक असल्याचे नाटो अधिकार्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रशियाने या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी केली. अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी ‘सॅटन 2’च्या या चाचणीवर जोरदार टीका केली होती. रशिया शस्त्रस्पर्धा भडकविण्याच्या तयारीत असून आपल्या छोट्या शेजारी देशांना दहशतीखाली ठेवण्यासाठी या चाचणीचा वापर करीत असल्याचा आरोप नाटोने केला होता.
पण पाश्चिमात्य देशांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करून ‘सॅटन 2’ची आणखी एक चाचणी करणार असल्याचे रशियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल वॅलेरी गेरासिमोव यांनी जाहीर केले. ही चाचणी कधी होईल, याची माहिती रशियन संरक्षणदलप्रमुखांनी दिली नाही. पण पुढच्या महिन्याभरात ही चाचणी होऊ शकते, असा दावा रशियातील लष्करी विश्लेषक करीत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर रशियाकडील प्रगत क्षेपणास्त्रे आणि पाणबुड्यांचे प्रदर्शन केले होते. रशियन क्षेपणास्त्राच्या मार्यापासून जगातील कुठलाही देश सुरक्षित नसल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले होते. या पार्श्वभूमीवर, ‘सॅटन 2’च्या चाचणीची घोषणा करून रशियाने आंतरराष्ट्रीय तापमान अधिकच वाढविल्याचे दिसत आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)