जीनिव्हा/वॉशिंग्टन – सध्या अज्ञात असलेल्या एखाद्या जीवाणू किंवा विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडविणार्या भीषण रोगाची साथ येऊ शकते. या अज्ञात साथीमुळे कोट्यवधी नागरिकांचा बळी जाऊ शकतो, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटना व आघाडीच्या संशोधकांनी दिला. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाला ‘डिसिज एक्स’ असे नाव दिले असून ‘बायोलॉजिकल म्युटेशन्स’च्या सहाय्याने याची निर्मिती केली जाऊ शकते, असेही बजावले आहे. गेल्याच महिन्यात ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगविख्यात कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांनी, भयंकर रोगाची साथ अवघ्या सहा महिन्यात तीन कोटींहून अधिक जणांचा बळी घेईल’ असा खळबळजनक इशारा दिला होता.
मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेने ‘ब्ल्यूप्रिंट लिस्ट ऑफ प्रायोरिटी डिसिजेस’ प्रसिद्ध केली होती. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हाहाकार माजवू शकेल, अशा स्वरूपाच्या रोगांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ‘झिका’, ‘सार्स’, ‘एबोला’, ‘लॅस्सा फिव्हर’ यासारख्या रोगांबरोबरच ‘डिसिज एक्स’चाही समावेश करण्यात आला आहे. ‘डिसिज एक्स’बद्दल पुढे इशारा देताना या रोगाचा जीवाणू/विषाणू अद्याप माहीत नसून त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भीषण संहार घडविणार्या अज्ञात रोगाची साथ येऊ शकते, असे बजावले होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या या इशार्याचा आधार घेऊन अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने जगभरातील तब्बल १२० शास्त्रज्ञ व संशोधकांच्या सहाय्याने नवा अहवाल तयार केला. ‘द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅन्डेमिक पॅथोजेन्स’ नावाच्या या अहवालात नवी अज्ञात साथ हवेतून श्वसनामार्गे पसरणारी असू शकते, असा दावा केला आहे. यापूर्वी जगात आलेल्या विविध रोगांच्या साथी, जैविक युद्धासाठी वापरण्यात येणारे घटक व सध्याच्या काळातील आजार अशा विविध गोष्टींचा आधार घेऊन हा अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ संशोधक डॉक्टर अमेश अदाल्जा यांनी दिली.
श्वसनामार्गे होणार्या नव्या आजाराच्या विषाणूत झटपट बदलण्याची क्षमता असेल आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व संशोधकांना त्याविरोधातील उपचारासाठी फारशी तयारी करण्याची संधीही मिळणार नाही, असा इशाराही डॉक्टर अदाल्जा यांनी दिला. श्वसनामार्गे होणारे आजार मानवी समाजात प्रचंड बदल घडविणारे ठरतील, असेही अहवालात बजावण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात, अमेरिकेतील एका चर्चासत्रात बिल गेट्स यांनी थरकाप भरविणारा इशारा दिला होता. ‘जगात लवकरच नव्या घातक रोगाची साथ येऊ घातली आहे. इतिहास लक्षात घेतला तर ही गोष्ट येत्या दशकभरात कधीही घडू शकते आणि त्यासाठी आपण योग्य तयारी केलेली नाही’, असे गेट्स यांनी बजावले होते. गेट्स यांनी यावेळी जैविक युद्धाचीच भयावह शक्यता वर्तविली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे यासंदर्भात समोर येणार्या बातम्यांचे महत्त्व अनेकपटींनी वाढले आहे.
‘एबोला’च्या नव्या साथीमुळे काँगोत २३ जणांचा बळी
किन्शासा – आफ्रिकेतील काँगोमध्ये एबोला विषाणूच्या साथीने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून त्यात २३ जणांचा बळी गेला आहे. काँगोतील ‘एम्बन्दाका’ शहरात एबोलाची साथ आढळली असून हे शहर देशातील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असल्याने नवी साथ अतिशय भीषण परिणाम घडविणारी ठरेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली. यापूर्वी आफ्रिकेत २०१४ ते २०१६ मध्ये आलेल्या ‘एबोला’च्या साथीने ११ हजारांहून अधिक जण दगावले होते.
गेल्या आठवड्यापासून काँगोत ‘एबोला’ची साथ आल्याचे समोर आले असून तीन वेगवेगळ्या भागांमध्ये साथ पसरल्याचे उघड झाले. ४० हून अधिक नागरिकांना ‘एबोला’ची लागण झाली असून सुमारे चार हजार जणांची तपासणी करण्यात येत आहे. या साथीचा मुकाबला करण्यासाठी काँगोत ‘एबोला’ची लस पाठविण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. काँगोत १९७०च्या दशकानंतर ‘एबोला’ची साथ येण्याची ही नववी वेळ आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/997506512707731456 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/395169384224885 |