मॉस्को – रशियन संरक्षणदलांच्या आण्विक मारकक्षमतेत वाढ करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली आहे. रशियन लष्करी अधिकार्यांची बैठक संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हे धोरण जाहीर केले. तसेच रशियन संरक्षणदलांकडील अत्याधुनिक शस्त्रसाठ्यात वाढ केली जाईल आणि रशियन संरक्षणदल जगभरात शांतता व समतोल प्रस्थापित करतील, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून रशियन राष्ट्राध्यक्ष आपल्या देशाच्या लष्करी सामर्थ्याची जगाला वारंवार जाणीव करून देत आहेत. रशियाकडी अण्वस्त्रे सार्या जगाला खाक करू शकतात. रशियन क्षेपणास्त्रांच्या मार्यापासून जगातील कोणताही देश सुरक्षित राहू शकत नाही, असे दावे करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी खळबळ माजविली होती. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात रशियाकडील अण्वस्त्रांचा वेध घेणे कुणालाही शक्य होणार नाही, असे सांगून पुतिन यांनी आपण थेट अणुयुद्ध पुकारताना कचरणार नाही, असा संदेश दिला होता.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून असे इशारे दिले जात असताना, त्यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे माजी लष्करी अधिकारी देखील रशियन राष्ट्राध्यक्ष वेळ पडलीच तर अण्वस्त्रांचा वापर करतील, अशा धमक्या सातत्याने देत आहेत. सिरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेने सिरियन राजवटीवर हल्ले चढविले होते. यातून अणुयुद्ध पेट घेईल, असा दावा रशियाकडून सातत्याने केला जात आहे. यामुळे अस्थैर्य आणि चिंता वाढत असतानाच, रशियन राष्ट्राध्यक्षांनी लष्करी अधिकार्यांची बैठक संबोधित करताना, पुन्हा एकदा अण्वस्त्रांबाबत महत्त्वपूर्ण विधान केल्याचे दिसत आहे.
रशियन संरक्षणदलांच्या आण्विक मारकक्षमतेत वाढ करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी केली. अमेरिकेप्रमाणेच रशियाच्या संरक्षणदलांकडे अणुहल्ले चढविण्याची क्षमता आहे. जमिनीवरून, सागरी क्षेत्र तसेच आकाशातून अण्वस्त्रांचे हल्ले चढविण्याची क्षमता असलेल्या देशांमध्ये रशियाचा समावेश असून रशियाकडेच सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा असल्याचे दावे केले जातात. या पार्श्वभूमीवर, रशियाच्या सर्वोच्च नेतृत्त्व आपल्या संरक्षणदलांच्या आण्विक मारकक्षमतेत वाढ करण्याची घोषणा करून जगभरातील तणाव वाढवित असल्याचे दिसते आहे.
दरम्यान, रशियाकडून अशारितीने आपल्या आण्विक धोरणात आक्रमक बदल केले जात असताना, त्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अणुहल्ल्याचा निर्णय घेण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया कमी करून तत्काळ अणुहल्ला चढविण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल, अशा स्वरूपाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यावेळी रशियाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
यानंतरच्या काळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व वरिष्ठ अधिकारी सातत्याने अणुयुद्धाचे इशारे देत असल्याचे उघड झाले होते. याची गंभीर दखल अमेरिका व ब्रिटनने घेतली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/1003300600778407937 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/401155453626278 |