वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेच्या प्रगत पाणबुड्या व त्यावरील शस्त्रास्त्र यंत्रणांची संवेदनशील माहिती चोरल्याचा दावा अमेरिकी अधिकार्यांनी केला. अमेरिकी तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या वर्षाच्या सुरुवातीला ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. ‘साऊन चायना सी’ व पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका तसेच पाणबुड्यांची आक्रमक तैनाती सुरू असतानाच ही घटना समोर आल्याने जोरदार खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘सीबीएस न्यूज’ या प्रसारमाध्यमांनी चीनच्या खळबळजनक सायबरहल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या हॅकर्सनी सायबरहल्ल्याद्वारे अमेरिकेच्या नौदलाची अत्यंत महत्त्वाची व गोपनीय माहिती चोरल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकी नौदलाच्या ‘नॅव्हल अंडरसी वॉरफेअर सेंटर’साठी काम करणार्या एका कंत्राटदाराकडून चीनने ही माहिती चोरल्याचे उघड झाले. ‘नॅव्हल अंडरसी वॉरफेअर सेंटर’ या विभागाकडे पाणबुड्या व त्यासाठी वापरण्यात येणार्या शस्त्रास्त्र यंत्रणांचे संशोधन तसेच विकासाची जबाबदारी आहे.
या प्रकरणात कंत्राटदार अथवा कंपनी कोणती आहे, याची माहिती देण्यास अमेरिकी अधिकार्यांनी नकार दिला. मात्र चिनी हॅकर्सनी तब्बल ६१४ गिगाबाईट्स (जीबी) इतक्या प्रचंड प्रमाणात माहिती मिळविल्याचे समोर आले आहे. त्यात ‘सी ड्रॅगन’ नावाच्या अत्यंत गोपनीय प्रकल्पाच्या माहितीचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ‘सिग्नल्स व सेन्सर डेटा’, पाणबुड्यांच्या ‘क्रिप्टोग्राफिक सिस्टिम्स’मधील माहिती तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लायब्ररी’तील माहितीही चोरी झाल्याचे उघड झाले.
‘सी ड्रॅगन’ प्रकल्प हा पाणबुड्यांवर युद्धनौकांना भेदू शकेल अशी ‘सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे’ विकसित करण्याच्या योजनेचा भाग असल्याचे सांगण्यात येते. २०१५ साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यासाठी ३० कोटी डॉलर्सची तरतूद केली होती. २०२० साली अमेरिकेकडून तैनात करण्यात येणार्या पाणबुड्यांवर सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार होती, असेही मानले जाते.
चीनकडून गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या संरक्षणक्षे त्रातील गोपनीय माहिती चोरण्यात येत आहे. यापूर्वी अमेरिकेचे प्रगत लढाऊ विमान ‘एफ-३५’, ‘पॅट्रिऑट क्षेपणास्त्र यंत्रणा’, ‘थाड’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, नौदलाचे ‘लिटोरल कॉम्बॅट शिप’ यांची माहिती चीनने चोरल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. अमेरिकेच्या ‘ड्रोन्स’ तंत्रज्ञानाची कॉपी करून चीनने आपले ड्रोन्स विकसित केल्याचेही समोर आले होते. अमेरिकेतून याबाबत सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी ही चोरी रोखण्यात अद्यापही अमेरिकेला यश आलेले नाही.
गेल्या काही वर्षात अमेरिका चीनला रोखण्यासाठी ‘साऊथ चायना सी’ व पॅसिफिक क्षेत्रात आक्रमक संरक्षण तैनाती करीत आहे. त्यात विमानवाहू युद्धनौका व प्रगत क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकी नौदलाचा चीननजिकच्या क्षेत्रात वावर वाढत असतानाच नौदलाची गोपनीय माहिती चीनच्या हाती पडणे अमेरिकी नौदलासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |