चीन व युरोप चलनाचे अवमूल्यन करून व्यापारी लाभ उकळत आहेत – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

चीन व युरोप चलनाचे अवमूल्यन करून व्यापारी लाभ उकळत आहेत – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिकेबरोबरील व्यापारात प्रचंड फायदा उकळणार्‍या चीन व युरोपला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले. चीन व युरोप अमेरिकेचे दोन्ही व्यापारी भागीदार चलनाचे मूल्य जाणीवपूर्वक कमी ठेऊन मोठा आर्थिक लाभ मिळवित असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. आता अमेरिकेने कर लादल्यावर आपले अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल, असे चित्र चीन व युरोप उभे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी चीनबरोबरील व्यापारयुद्ध लवकर संपण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी बजावले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून सातत्याने चीन व युरोपकडून अमेरिकेची व्यापारी लूट सुरू असल्याची भूमिका घेतली आहे. या मुद्यावरून चीन व युरोपबरोबर झालेल्या चर्चेनंतरही त्यांच्या व्यापारी पद्धतींमध्ये फरक पडला नव्हता. त्यामुळे मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुरुवातील चीन व त्यानंतर युरोपविरोधात आयात कर लादण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या या कारवाईला चीन व युरोपने ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला फारसे यश मिळालेले नाही.

त्याचवेळी ट्रम्प यांनी मात्र आपले धोरण अधिकाधिक आक्रमक करण्यास सुरुवात केली असून चीनच्या संपूर्ण आयातीवर कर लादण्याची धमकी दिली आहे. यूरोपातून अमेरिकेत येणार्‍या गाड्या व इतर प्रमुख उत्पादनांवरही मोठा कर लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. चीन व युरोपच्या व्यापारी पद्धतींना लक्ष्य करीत असतानाच ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा दोन्ही भागीदारांच्या चलनाकडे वळविल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान चीनच्या लुटीचा उल्लेख करताना त्या देशाला ‘करन्सी मॅनिप्युलेटर’ म्हणून घोषित करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. ट्रम्प यांच्या प्रशासनाने अद्याप तसा निर्णय घेतला नसला, तरी त्या दृष्टीने पूर्ण तयारी केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

‘चीन जाणीवपूर्वक त्यांच्या चलनाचे युआनचे अवमूल्यन करीत आहे. युरोपिय महासंघाकडूनही युरो चलनाचे मूल्य कमी ठेवले जात आहे. चलनाचे अवमूल्यन केल्यानंतरही चीन व युरोप आता त्यांना अब्जावधी डॉलर्स अमेरिकेच्या तिजोरीत जमा करावे लागणार, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत’, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीन व युरोपला लक्ष्य केले.

अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धावर तोडता काढण्यासाठी चीनचे शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल होत असतानाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला लक्ष्य करणे महत्त्वाचे मानले जाते. ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात चीनच्या शिष्टमंडळाचाही उल्लेख केला असून पुढील दोन दिवसात होणार्‍या चर्चेतून फारसे काही हाती लागणार नाही, असा टोलाही लगावला. चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धावर बोलताना ट्रम्प यांनी हे व्यापारयुद्ध लवकर संपणार नसल्याचा इशारा दिला.

‘चीनने अनेक वर्षे अमेरिककडून मोठ्या प्रमाणात व्यापारी लाभ मिळविले आहेत. चीन आता बिघडला आहे. यापूर्वी त्यांनी अशा लोकांबरोबर व्यवहार केले आहेत, ज्यांना ते नक्की काय करीत आहेत याचीच कल्पना नव्हती. त्यामुळेच अमेरिकेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे’, असेही ट्रम्प म्हणाले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info