ब्युनॉस आयर्स – अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट करार, अशी संभावना करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा व मेक्सिकोबरोबरील ‘नाफ्टा’ करार रद्द केला होता. त्याऐवजी दोन्ही देशांबरोबर यशस्वी वाटाघाटी करून स्वतंत्र करार करण्यात पुढाकार घेऊन ट्रम्प यांनी नव्या कराराची घोषणा केली होती. अर्जेंटिनात सुरू असलेल्या ‘जी-20’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या ‘युएस-मेक्सिको-कॅनडा अॅग्रीमेंट’ (युएसएमसीए) करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. ट्रम्प यांनी, जगातील आघाडीच्या देशांविरोधात व्यापारयुद्ध सुरू केल्याचे दावे होत असतानाच अमेरिकेने बहुराष्ट्रीय करारावर स्वाक्षर्या करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
‘नवा करार हे अत्यंत महत्त्वाचे यश असून हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. अमेरिकेच्या वाहनक्षेत्रातील कामगारांना याचा प्रचंड फायदा होणार आहे. या क्षेत्रातील रोजगार अमेरिकबाहेर जाण्याचे प्रमाण आता नक्कीच थांबेल. करारातील बुद्धिसंपदा हक्कांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या तरतुदी जगातील इतर देशांच्या असूयेचे कारण ठरणार आहेत. यासाठी आम्ही अनेक अडचणींचा सामना केला आहे’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करारावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मेक्सिको व कॅनडानेही कराराचे स्वागत केले असून हा करार अधिक संधी निर्माण करणारा व कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा असेल, असा दावा केला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी नवा करार मध्यमवर्गाला अधिक मजबूत करणारा व व्यावसायिकांसाठी नवी क्षेत्रे खुली करणारा असल्याचे सांगून त्याचे स्वागत केले.
यापूर्वी अमेरिका-कॅनडा व मेक्सिकोमध्ये करण्यात आलेल्या ‘नाफ्टा’ करारावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सातत्याने टीका केली होती. हा करार अमेरिकेचे रोजगार हिरावणारा व निर्यात क्षेत्राची प्रगती घटविणारा आहे, असा आरोप त्यांनी केला होता. या करारामुळे अमेरिकेने अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सहन केल्याचे सांगून ट्रम्प यांनी नवा करार करण्याचे जाहीर केले होते.
कॅनडा व मेक्सिकोने ‘नाफ्टा’ रद्द करण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेने या देशांवर नवे कर तसेच निर्बंध लादले होते. नव्या करारात, अमेरिकी उद्योगांना कॅनडा व मेक्सिकोच्या बाजारपेठेत योग्य संधी उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात आली आहे. अमेरिकेची या देशांमधील निर्यात वाढेल, अशी खबरदारीही घेण्यात आल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला.
कॅनडा व मेक्सिकोबरोबरील नवा करार हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी’चा विजय मानण्यात येतो. या करारामुळे ट्रम्प यांनी चीन व युरोपसारख्या देशांबरोबरील व्यापाराविरोधात कारवाईसाठी उचललेली पावले योग्य असल्याचे दिसून येते, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |