वॉशिंग्टन/तेहरान, दि. २४ (वृत्तसंस्था) – इराणची क्षेपणास्त्र व रॉकेट यंत्रणेवर अमेरिकेने सायबर हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेच्या वर्तमानपत्राने ही माहिती उघड केली. त्यानंतर इराणने अमेरिकेच्या सायबर हल्ल्यांची कबुली दिली. अमेरिकेने सायबर हल्ले चढविले आहेत खरे, पण त्यात इराणचे अजिबात नुुकसान झालेले नाही. हे हल्ले परतवून लावण्यात इराणला यश मिळाल्याचा दावा इराणच्या मंत्र्यांनी केला आहे. त्याचवेळी इराणनेही अमेरिकेवर सायबर हल्ले चढविल्याचे सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांनी म्हटले आहे.
इराणने गेल्या आठवड्यात क्षेपणास्त्र हल्ला चढवून अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता बळावली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लष्कराला इराणवर हल्ले चढविण्याचे आदेशही दिले होते. पण काही मिनिटे आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मनुष्यहानी टाळण्यासाठी आपला निर्णय मागे घेतला होता. पण पुढच्या काही तासात ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या ‘सायबर कमांड’ने इराणवर सायबर हल्ले चढविले, अशी माहिती ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली.
या सायबर हल्ल्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून नियंत्रित केले जाणारे क्षेपणास्त्र व रॉकेट्सच्या कम्प्युटर्सना लक्ष्य केल्याचा दावा अमेरिकी वर्तमानपत्राने केला. अमेरिकेच्या सायबर कमांडने फार आधी या हल्ल्याची तयारी केली होती. गेल्या महिन्यात सौदी अरेबियाच्या इंधनवाहू जहाजांवर झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतरच सायबर हल्ल्यांचा विचार होता, असेही सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अधिकार्याने हे वृत्त फेटाळले आहे.
पण इराणचे माहिती आणि संपर्क यंत्रणा विभागाचे मंत्री ‘मोहम्मद जावेद अझारी-जहरोमी यांनी अमेरिकेने सायबर हल्ले चढविल्याची कबुली दिली. अमेरिकेने सायबर हल्ल्यांद्वारे इराणचे मोठे नुकसान करण्याचा अपयशी प्रयत्न केल्याचे अझारी-जहरोमी यांनी सांगितले. गेल्या वर्षी इराणने प्रचंड प्रमाणात झालेले सायबर हल्ले यशस्वीरित्या परतवून लावल्याचा दावाही इराणच्या नेत्याने केला. त्याचवेळी सायबर सुरक्षा क्षेत्रातील दोन अमेरिकी कंपन्यांनी वेगळीच माहिती प्रसिद्ध केली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका व इराणचे परस्परांवर सायबर हल्ले सुरू आहेत. इराणकडून अमेरिकेच्या प्रशासकीय यंत्रणा तसेच इंधन व गॅस कंपन्या आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांवर सायबर हल्ले सुरू आहेत. फिशिंग ईमेल्सद्वारे इराण अमेरिकेवर सायबर हल्ले चढवित असल्याचे या अमेरिकी कंपन्यांचे म्हणणे आहे. या सायबर हल्ल्यात अमेरिकेचे नुकसान झाले का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र अमेरिकेने इराणवर नव्या सायबर हल्ल्यांची तयारी केल्याचा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्राने केला आहे.
इराणच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर सायबर हल्ले चढविण्याची योजना अमेरिकेचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेने आखली आहे. त्याचबरोबर होर्मुझच्या आखातात तैनात इराणच्या शेकडो गस्तीनौकांना निकामी करण्यासाठी अमेरिकेची तयारी सुरू झाली आहे. या व्यतिरिक्त इराणमधील राजवटीविरोधात अस्थैर्य माजविण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने केला.
याआधी अमेरिकेने ‘स्टक्सनेट’ व्हायरसचा वापर करून इराणच्या नातांझ अणुप्रकल्पातील हजारो सेंट्रीफ्युजेस् निकामी करून टाकले होते. या हल्ल्याची कल्पना येण्यासाठीही इराणला बराच अवधी लागला होता. काही आठवड्यांपूर्वी, इस्रायल आपल्या अणुप्रकल्पांवर सायबर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा आरोप इराणने केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |