अण्वस्त्रांसाठी लागणार्‍या संवर्धित युरेनियमसाठी इराणकडून प्रगत सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित झाल्याची घोषणा

अण्वस्त्रांसाठी लागणार्‍या संवर्धित युरेनियमसाठी इराणकडून प्रगत सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित झाल्याची घोषणा

तेहरान – अण्वस्त्रांसाठी लागणारे संवर्धित युरेनियम मिळविण्यासाठी इराणने प्रगत सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित केल्याची घोषणा केली आहे. इराणच्या ‘अ‍ॅटोमिक एनर्जी ऑर्गनायझेशन’च्या प्रमुखांनी शनिवारी याची माहिती दिली. इराणच्या या घोषणेमुळे तो २०१५ सालच्या अणुकराराचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून त्याबद्दल आश्‍चर्य वाटत नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी, इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी २०१५ सालच्या अणुकरारातील तरतुदींपासून माघार घेण्याची घोषणा केली होती. ‘यापुढे इराण अधिक प्रगत ‘सेंट्रिफ्युजेस’ची निर्मिती सुरू करणार आहे. या प्रगत सेंट्रिफ्युजेसच्या निर्मितीमुळे इराण अधिक वेगाने युरेनियम संवर्धित करु शकणार आहे’, असे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी सांगितले होते. इराणच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा म्हणजे इराणने अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल असल्याचे मानले जाते.
राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेवर शनिवारी इराणी यंत्रणांनी शिक्कामोर्तब केले. इराणच्या ‘अ‍ॅटोमिक एनर्जी ऑर्गनायझेशन’चे प्रमुख बेहरोझ कमालवंदी यांनी प्रगत सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित केल्याची माहिती दिली. त्यानुसार इराणने ‘आयआर-४’ व ‘आयआर-६’ प्रकारातील सेंट्रिफ्युजेस कार्यरत केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यांची क्षमता पूर्वी वापरण्यात येणार्‍या सेंट्रिफ्युजेसपेक्षा जास्त असल्याचा दावाही इराणच्या ‘अ‍ॅटोमिक एनर्जी ऑर्गनायझेशन’च्या प्रमुखांनी केला.

काही महिन्यांपूर्वी इराणने युरोपिय देशांना अणुकरार वाचविण्यासाठी काही अटी घातल्या होत्या. त्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर इराण टप्प्याटप्प्याने कराराचे उल्लंघन करणारी पावले उचलेल, असा इशारा इराणने दिला होता. सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित करणे हा तिसरा व अखेरचा टप्पा मानला जातो. त्यामुळे इराणने आता पुन्हा एकदा अण्वस्त्रसज्ज होण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते.

इराणने सुरू केलेल्या सेंट्रिफ्युजेसच्या प्रक्रियेचे आश्‍चर्य वाटत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी दिली. ‘इराण कायमच अणुकराराचे उल्लंघन करीत आला आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी अण्वस्त्रप्रसारबंदी करार धुडकावला होता. इराणला जे करायचे असते ते हा देश करतोच’, अशा शब्दात एस्पर यांनी इराणची बाजू घेणार्‍या देशांना टोला लगावला. इराणने आपल्या सेंट्रिफ्युजेससंदर्भातील टप्प्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला दिल्याचेही समोर आले आहे. अणुऊर्जा आयोगाने लवकरच आपले वरिष्ठ अधिकारी इराणला भेट देतील, असे संकेत दिले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info