गाझा- इस्रायल आणि पॅलेस्टाईनची समस्या सोडविण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घोषित केलेल्या प्रस्तावावर पॅलेस्टिनींची जहाल प्रतिक्रिया उमटत आहे. गाझाच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरलेले पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे फोटोग्राफ्स जाळून आपला संताप व्यक्त करीत आहेत. काहीही झाले तरी हा प्रस्ताव आम्ही मान्य करणार नाही, सारी पॅलेस्टिनी जनता एकजुटीने अमेरिका-इस्रायलचा डाव हाणून पाडल्यावाचून राहणार नाही, असा इशारा हमासच्या नेत्यांनी दिला आहे.
अखंड जेरूसलेमवर इस्रायलचा अधिकार अबाधित राहून जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असेल, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या ‘पीस प्लॅन’मध्ये म्हटले होते. याच्या मोबदल्यात पॅलेस्टाईनकडे सध्या असलेल्या जागेच्या दुप्पट जमीन दिली जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. तसेच पूर्व जेरूसलेममध्ये पॅलेस्टाईनचीही राजधानी असू शकेल, असे सांगून ट्रम्प यांनी हा प्रस्ताव म्हणजे ‘डील ऑफ द सेंच्युरी’ असल्याचा दावा केला.
‘कुठल्याही इस्रायली किंवा पॅलेस्टिनींना आपली राहती जागा सोडावी लागणार नाही, हे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरते. हा प्रस्ताव स्वीकारून पॅलेस्टाईनने दहशतवाद व हिंसेचा मार्ग सोडून दिला तर अमेरिका पॅलेस्टाईनमध्ये ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करील’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले होते. मात्र त्यांचा हा प्रस्ताव पॅलेस्टिनींनी पूर्णपणे झिडकरला आहे. गुरुवारी गाझाच्या रस्त्यांवर पॅलेस्टिनी मोठ्या संख्यने उतरून अमेरिका आणि इस्रायलचा तारस्वरात निषेध करीत होते.
या निदर्शकांनी टायर्स पेटविले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच इस्रायली पंतप्रधानांचे फोटोग्राफ्सही पेटवून आपला असंतोष व्यक्त केला. अमेरिका आणि इस्रायल आम्हाला जेरूसलेमसह पवित्र अल अक्सा मशिदीवरील अधिकार सोडून देण्यास सांगत आहे. ते कधीही शक्य होणार नाही, असे हे निदर्शक सांगत होते. याला विरोध करण्यासाठी आमची मुले देखील शाळेत गेलेली नाहीत, असा दावा पॅलेस्टिनी पालकवर्ग करीत आहे. तर हमासचा प्रवक्ता राफत मोर्रा यांनी या प्रश्नावर सार्या पॅलेस्टिनींची एकजूट असल्याचे म्हटले आहे.
‘अमेरिका व इस्रायल यांची ही योजना पॅलेस्टाईनला चिरडून टाकणारी, इस्रायलच्या पॅलेस्टाईनवरील अतिक्रमणाला अधिकृतता देणारी व पॅलेस्टिनींचे अधिकार डावलणारी आहे. ती कदापि खपवून घेतली जाणार नाही. उलट पॅलेस्टिनी आपल्या ध्येयासाठी यापुढे अधिक आक्रमकतेने संघर्ष करील व यासाठी पॅलेस्टिनींची एकजूट झालेली आहे’, असे रफात मोर्रा यांनी म्हटले आहे. इतर पॅलेस्टिनी नेते देखील याच भाषेत अमेरिका व इस्रायलचा निषेध नोंदवित आहेत.
तुर्की, इराण आणि जॉर्डन या देशांनी अमेरिकेच्या या प्रस्तावावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवून त्याला कडाडून विरोध केला आहे. तर सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातीने या प्रस्तावावर थेट प्रतिक्रिया न देता, इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र अमेरिकेच्या या प्रस्तावावर चर्चा शक्यच नसल्याचे सांगून पॅलेस्टिनींच्या सर्व संघटना चर्चेची शक्यताच निकालात काढत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |