वॉशिंग्टन – चीनच्या सत्ताधाऱ्यांना माझे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार, जो बिडेन यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकविण्याची इच्छा आहे. व्यापार व इतर मुद्यांवर मी चीनवर टाकलेले दडपण कमी व्हावे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाव्हायरस साथीच्या मुद्यावर आपण निष्पाप असल्याचे सिद्ध करण्यासाठी चीन आक्रमक पातळीवर प्रचारमोहीम राबवित आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाईल, अशा घणाघाती आरोपांच्या फैरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झाडल्या.
चीनच्या राज्यकर्त्यांनी कोरोनाव्हायरस साथीबाबतीत जगाला वेळीच योग्य ती माहिती पुरविणे आवश्यक होते, अशा शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनला लक्ष्य केले. साथीच्या मुद्यावर चीनने केलेल्या कारवायांसाठी त्या देशाला धडा शिकवला जाईल आणि त्यासाठी अनेक पर्यायांवर विचार सुरू आहे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या साथीचा तपास चालू असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या साथीविरोधात विकसित करण्यात येणाऱ्या लसीचे संशोधन वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून कोरोना विरोधात औषध तसेच लस विकसित करण्यासाठी संशोधन चालू आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ट्रम्प यांनी गेल्या तीन वर्षात चीनविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतलेली होती. चीनविरोधात व्यापारयुद्ध छेडून या बलाढ्य देशाला माघार घेण्यास त्यांनी भाग पाडले होते. चीनविरोधात ट्रम्प यांची कारवाई अमेरिकेतील त्यांच्या लोकप्रियतेत फार मोठी भर टाकणारी ठरली होती. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जातो.
मात्र गेल्या तीन महिन्यात कोरोनव्हायरसच्या साथीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्के बसले आहे. देशातील बेकारी विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचली आहे. ट्रम्प यांनी चीनमधून आलेल्या साथीचे संकट योग्य रीतीने हाताळले नसल्याचा सूर तीव्र होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाची साथ हे चीनने आपल्याला पाडण्यासाठी आखलेले षडयंत्र असल्याचा आरोप करून खळबळ उडवली आहे.
कोरोनाव्हायरससाठी चीनच जबाबदार आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग उपलब्ध असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीच बजावले होते. तर परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चीनवर साथीचा ठपका ठेवताना जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |