बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रशासनाकडून होणाऱ्या टीकेच्या भडीमाराला चीनने प्रत्युत्तर दिले आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून चीन व्यापारी करारासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले. त्याचवेळी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी मात्र अत्यंत धारदार शब्दात अमेरिकेला उत्तर दिले. कोरोनापाठोपाठ ‘पॉलिटिकल व्हायरस’ची बाधा झालेली अमेरिका चीनला सातत्याने बदनाम करीत असून त्यामुळे दोन देशांमधील संबंध नव्या शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून सातत्याने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी चीन विरोधात व्यापार युद्ध छेडणाऱ्या ट्रम्प यांनी सायबरहल्ले व इतर मुद्द्यांवर सातत्याने चीनवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा भडिमार अधिकच तीव्र होत चालला असून अमेरिका व चीनमध्ये उघड राजनैतिक युद्ध भडकल्याचे दिसत आहे. सुरूवातीला उपरोधिक टोले आणि दुर्लक्ष करून माघारीचे संकेत देणारा चीन आता मात्र चांगलाच बिथरल्याचे दिसत आहे.
चीनमध्ये सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ली केकिआंग व परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान केकियांग यांनी अमेरिकेला अनुल्लेखाने मारत चीनकडून सुरू असलेल्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती दिली. ट्रम्प यांच्याकडून सातत्याने येणाऱ्या धमक्यानंतरही चीन अमेरिकेबरोबर व्यापारी करार करण्यास उत्सुक असल्याचे सांगून आपण अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या धमक्यांकडे कानाडोळा करीत असल्याचे चीनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मात्र अमेरिकेविरोधात जोरदार हल्ला चढविला. ‘जगात कोरोनाव्हायरसची साथ पसरत असतानाच अमेरिकेत राजकीय विषाणू फैलावत आहे. हा राजकीय विषाणू चीनला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही’, या शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेतील राजकीय नेतृत्वावर जळजळीत टीका केली.
‘अमेरिकेतील काही राजकीय शक्ती अमेरिका-चीन संबंधांना ओलीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. याच राजकीय शक्ती अमेरिका व चीनला नव्या शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर नेण्यासाठी हालचाली करीत आहेत’, असा इशारा परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी दिला. हा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा धोकादायक डाव असल्याचेही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी बजावले.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन व ‘डब्ल्यूएचओ’ची खरडपट्टी काढली होती.
या खरडपट्टीनंतर चीनलाही कोरोना साथीची स्वतंत्र चौकशी मान्य करणे भाग पडले होते. त्यानंतर हॉंगकाँगच्या मुद्द्यावरून चीनविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. अवघ्या २४ तासांपूर्वी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीनच्या तब्बल ३३ कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले होते. एकामागोमाग बसलेल्या या फटक्यानंतर चीनने आता अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केल्याचे परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.
यापूर्वी अनेक आजी-माजी अधिकारी व विश्लेषकांनी अमेरिका व चीनमधील संभाव्य शीतयुद्धाबाबत इशारे दिले होते. मात्र आता थेट चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याची कबुली देऊन दोन देशांमधील राजनैतिक संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे संकेत दिले आहेत.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |