फ्रान्सकडून भूमध्य सागरी क्षेत्रात विनाशिका व लढाऊ विमाने तैनात – तुर्कीच्या धमकीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

फ्रान्सकडून भूमध्य सागरी क्षेत्रात विनाशिका व लढाऊ विमाने तैनात – तुर्कीच्या धमकीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

पॅरिस/इस्तंबूल – तुर्कीच्या कारवायांमुळे तणाव वाढल्याने फ्रान्सने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केली. फ्रान्सकडून भूमध्य सागरी क्षेत्रात ‘ला फाएत’ ही विनाशिका व रफायल विमाने तैनात करण्यात आली आहेत. गुरुवारी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी भूमध्य समुद्रातील हालचालींवरून ग्रीसला धमकावले होते. तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या या धमकीला फ्रान्सने संरक्षण तैनातीतून प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या संसदेत तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी निर्बंध लादण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे.

विनाशिका

काही दिवसांपूर्वी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात, ग्रीसच्या कॅस्टेलोरीझो बेटानजिक संशोधनासाठी दाखल होत असल्याची एकतर्फी घोषणा केली होती. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीससह युरोपीय देश व नाटोकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ग्रीसने आपला संरक्षणदलांना हाय अलर्ट जारी करत तुर्कीच्या कारवायांची टेहळणी सुरू केली होती. युरोपीय महासंघाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या जर्मनीने तुर्कीची सागरी मोहीम चुकीचा संदेश देणारी ठरते, अशा शब्दात फटकारले होते. ग्रीस व युरोपीय देशांच्या या आक्रमक भूमिकेनंतरही तुर्कीने आपला हेका सोडला नसल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या धमकावणीवरून दिसून येते.

‘जर ग्रीसने तुर्कीचे जहाज ओरुक रेईसवर हल्ला केला तर त्यांना त्याची जबर किंमत मोजणे भाग पडेल. ग्रीसला पहिला धक्का बसलाही असेल’, या शब्दात तुर्की राष्ट्राध्यक्षांनी धमकावले. तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या मुद्द्यावर युरोपीय महासंघाला पत्रही पाठवले असून त्यात युरोपिय देशांनी तुर्कीविरोधात अविचारी निर्णय घेऊ नये असे बजावले आहे. तुर्की कडून करण्यात आलेल्या या वक्तव्यानंतर फ्रान्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

विनाशिका

‘पूर्व भूमध्य सागरी क्षेत्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत चालली आहे. इंधन उत्खननाच्या मुद्द्यावर तुर्कीने घेतलेले एकतर्फी निर्णय या क्षेत्रातील तणावात अधिकच भर टाकीत आहेत. हा तणाव निवळणे आवश्यक आहे. यासाठी फ्रान्सने भूमध्य सागरी क्षेत्रातील आपली संरक्षण तैनाती अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रीससह इतर युरोपीय भागीदार देशांचेही सहकार्य घेण्यात येईल’, या शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अतिरिक्त तैनातीची घोषणा केली. या क्षेत्रात ‘ला फाएत’ ही विनाशिका व रफायल लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत.

विनाशिका

दरम्यान, तुर्कीच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतही हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेतील वरिष्ठ सिनेटर्सनी तुर्कीवर कठोर निर्बंध लादण्याची मागणी पुढे केली आहे. अमेरिकेतील संसदेच्या ‘सिनेट फॉरेन रिलेशन्स कमिटी’चे वरिष्ठ सदस्य असणाऱ्या बॉब मॅनेडेझ व ख्रिस व्हॅन हॉलेन यांनी, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना पत्र पाठवल्याचे समोर आले आहे. ‘अमेरिकेने तुर्कीवर ताबडतोब त्यांची जहाजे हटविण्यासाठी दडपण आणायला हवे. त्याचवेळी युरोपीय महासंघाने तुर्कीवर नवे निर्बंध टाकावेत यासाठी आग्रही भूमिका घ्यायला हवी’,अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तुर्कीने भूमध्य सागरी क्षेत्रातील कारवाया चालूच ठेवल्या तर तुर्की अर्थव्यवस्थेला जबर फटका बसेल असे निर्बंध टाकावेत, अशी शिफारसही पत्रात करण्यात आली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info