इस्रायल, युएईमधील करार तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे – तुर्कीच्या वर्तमानपत्राचा दावा

इस्रायल, युएईमधील करार तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे – तुर्कीच्या वर्तमानपत्राचा दावा

अंकारा – दहा दिवसांपूर्वी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात झालेला ऐतिहासिक शांतीकरार, सहकार्य इराणच्या विरोधात असल्याचे बोलले जाते. या सहकार्यामुळे इस्रायल आणि अरब देशांची इराणविरोधात मोठी आघाडी उभी रहात असल्याचे दावे केले जात आहेत. पण इस्रायल व युएईतील हे सहकार्य इराण नाही, तर तुर्कीच्या विरोधात आहे. या सहकार्याने इस्रायल, युएई व इतर अरब देशांनी तुर्कीला ‘टार्गेट’ केले असून सदर करार तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा तुर्कीच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे.

करार तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक

इस्रायल आणि युएईतील सदर सहकार्य हा इराणसाठी इशारा असल्याचे पाश्चिमात्य माध्यांनी म्हटले होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी आणि रिव्होल्युशनरी गार्डसनी यासाठी युएईला धमकावले होते. इस्रायलबरोबरच्या सहकार्याचे भीषण परिणाम येत्या काळात युएईला भोगावे लागतील, असा इशारा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला होता. पण युएई’ने याबाबत स्वतंत्र भूमिका स्वीकारुन सदर सहकार्यातून इराणसाठी कोणताही संदेश दिला नसल्याचे युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. तुर्कीच्या ‘डेलि सबाह’ या वर्तमानपत्राने युएईच्या या विधानाचा दाखला देऊन वरील दावा केला आहे.

सदर सहकार्य इराणच्या विरोधात नसल्याचे सांगणार्‍या युएईने तुर्कीबाबत अशी भूमिका स्वीकारली नसल्याची टीका या वर्तमानपत्राने केली. याउलट तुर्कीने अरब देशांच्या कारभारात ढवळाढवळ करू नये, असे सांगून युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कीला फटकारले होते, याची आठवण तुर्कीच्या वर्तमानपत्राने करुन दिली. याआधी सिरिया, लिबिया तसेच आखात किंवा भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या प्रभावाविरोधात सौदी अरेबिया, युएई तसेच अरब मित्रदेश आणि फ्रान्स व ग्रीस यांची आघाडी काम करीत होती. पण इस्रायल व युएई यांच्यातील नवे सहकार्य यापुढे आखात तसेच भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या प्रभावाविरोधात काम करणारे असेल. ही नवी आघाडी तुर्कीला आव्हान देणारी ठरेल, असा दावा सदर वर्तमानपत्राने केला.

करार तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक

तर, इस्रायलबरोबरच्या या सहकार्यातून युएई व इतर अरब देशांनी पॅलेस्टाईनबाबत केलेली डिल तुर्कीच्या आत्तापर्यंतच्या प्रयत्‍नांना शह देण्याचा कट असल्याचा ठपका या वर्तमानपत्राने ठेवला. एकूणच युएईने इस्रायलबरोबर केलेला सदर करार तुर्कीच्या विरोधात असल्याचा आरोप या वर्तमानपत्राने केला. पण इस्रायल व युएईतील हे सहकार्य आकार घेत असताना तुर्की देखील शांत बसणार नसल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. लिबियामध्ये तुर्कीने आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याची जाणीव या वर्तमानपत्राने करुन दिली.

दरम्यान, गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेचे वरिष्ठ नेते तुर्कीमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हनिया तसेच सालेह अल-अरुरी आणि माहेर सलाह यांचा समावेश आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी या हमासच्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुर्कीने हमासच्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info