म्यानमारच्या लष्कराच्या निर्दयी कारवाईत सात वर्षाच्या मुलीची हत्या – निदर्शकांसह जनतेकडूनही लष्कराविरोधात संतप्त प्रतिक्रिया

म्यानमारच्या लष्कराच्या निर्दयी कारवाईत सात वर्षाच्या मुलीची हत्या – निदर्शकांसह जनतेकडूनही लष्कराविरोधात संतप्त प्रतिक्रिया

म्यानमारयांगून – म्यानमारच्या लष्कराकडून लोकशाहीवादी आंदोलकांविरोधात सुरू असलेल्या क्रूर कारवाईत एका सात वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. पोलिस व लष्कराच्या संयुक्त पथकाने घरात घुसून ख्यिन मो चित व तिच्या वडीलांवर गोळ्या झाडल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. या घटनेने म्यानमारच्या जनतेत संतापाची तीव्र लाट उसळली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार लोकशाहीवादी गटांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अमेरिका व युरोपिय महासंघाने म्यानमारच्या लष्करावर नवे निर्बंध लादल्याची घोषणा केली.

म्यानमारमध्ये गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ लष्करी बंडाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. लष्कराने जबरदस्तीने ताब्यात घेतलेली सत्ता सोडावी आणि लोकशाहीवादी सरकारच्या हाती सर्व सूत्रे द्यावीत यासाठी व्यापक आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून प्रचंड समर्थन मिळाले असून बंडखोर संघटना तसेच प्रभावशाली धार्मिक गटांनीही त्यात उडी घेतली आहे. आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहून म्यानमारच्या लष्करानेही आपल्या क्रौर्यात अधिकच वाढ केल्याची धक्कादायक बाब गेल्या काही दिवसांमधील घटनांमधून समोर येत आहे.

क्रूर कारवाईत

गेल्याच आठवड्यात म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईत अवघ्या २४ तासांमध्ये ५५हून अधिक निदर्शकांचा बळी गेला होता. रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्‍या निदर्शकांबरोबरच लष्कराने आता घरात असणार्‍या निष्पाप म्यानमारी जनतेवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. केवळ संशयावरून वेगवेगळ्या घरांमध्ये घुसून सामान्य नागरिकांना ताब्यात घेण्यात येत असून त्यांना बेदम मारहाणही करण्यात येत आहे. काही भागांमध्ये रस्त्यावरून गस्त घालणार्‍या लष्करी पथकांनी आजूबाजूंच्या घरांवर बेछूट गोळीबार केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मंगळवारी झालेली कारवाई अशाच घटनांपैकी असल्याचे सांगण्यात येते. म्यानमारमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असणार्‍या मंडालेमधील ‘चॅन म्या थाजी टाऊनशिप’मध्ये मंगळवारी पोलिस व लष्कराची पथके घुसली. यावेळी जवळपास ३० जवानांचे पथक एका घरात घुसले व घरात बसलेल्या सात वर्षाच्या मुलीसह तिच्या वडिलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी घरातील काहीजणांना पकडून नेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. कारवाईत ख्यिन मो चित या सात वर्षाच्या मुलीच्या पोटात गोळी झाडण्यात आली असून तिचा जागीच मृत्यू झाला.

ख्यिन मो चित ही आतापर्यंतच्या लष्कराच्या कारवाईत बळी गेलेली सर्वात लहान मुलगी ठरली आहे. आतापर्यंत म्यानमारच्या लष्कराने केलेल्या क्रूर कारवायांमध्ये सुमारे २० मुलांचा बळी गेला असून त्यात एका आठ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या मुद्यावर कोणत्याही प्रकार वक्तव्य करण्यास लष्करी सूत्रांनी नकार दिला आहे. मात्र ख्यिन मो चितच्या मृत्यूनंतर म्यानमारनमधील जनतेत लष्कराविरोधात संतापाची लाट उसळली असून, लोकशाहीवादी गटांनी आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बुधवारी म्यानमारच्या अनेक शहरांमध्ये ‘सायलेंट स्ट्राईक’ पाळण्यात आला. प्रमुख शहरांमधील सर्व व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र यावेळी दिसून आले. लष्कराकडून देशात सर्व काही आलबेल आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न होत असताना ‘सायलेंट स्ट्राईक’ला मिळालेले यश लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरून म्यानमारच्या लष्करावर दडपण आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अमेरिका व युरोपिय महासंघाने वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच लष्करी पथकांवर निर्बंध लादल्याची घोषणा केली आहे. तर मलेशियाने म्यानमारमधून अवैधरित्या दाखल झालेल्या नागरिकांना पुन्हा माघारी पाठविण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. म्यानमारमधील लष्करी बंडाच्या मुद्यावर ‘आसियन’ची बैठक होईपर्यंत ही स्थगिती राहिल, असे सांगण्यात आले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info