मॉस्को – घनघोर संघर्ष सुरू असताना, युक्रेनमध्ये शांतीसैन्य पाठविण्याचा प्रस्ताव पोलंडने दिला आहे. नाटोचे सदस्य असलेल्या बाल्टिक देशांनीही यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर रशियाची जहाल प्रतिक्रिया उमटली असून परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी यामुळे रशियाचा नाटोशी थेट संघर्ष भडकेल आणि त्याचे भीषण परिणाम होतील, असा इशारा दिला. यानंतर रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी आपल्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्यास, रशिया अण्वस्त्रांचा वापर करील, अशी गर्जना केली. त्यावर अणुयुद्धात रशियाला विजय मिळू शकत नसल्याचे नाटोने बजावले आहे.
युक्रेनमधील युद्धाच्या २८ व्या दिवशी अणुयुद्धाबाबत दोन्ही बाजूंनी दिलेले इशारे जगाचा थरकाप उडवित आहेत. पोलंडने युक्रेनमध्ये शांतीसैन्य पाठविण्याचा प्रस्ताव देऊन रशियाला थेट आव्हान दिल्याचे दिसते. बाल्टिक देशांनी यासाठी हालचाली सुरू केल्या असून याची गंभीर दखल रशियाने घेतली. युक्रेनमध्ये कुठल्याही स्वरुपात नाटोचे सैनिक तैनात करण्यात आलेच, तर त्यामुळे नाटो व रशियामध्ये थेट संघर्षाचा भडका उडाल्यावाचून राहणार नाही. ही बाब अतिशय भीषण परिणाम घडविणारी ठरेल, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. रशियाचे सरकार व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी यावरून अणुयुद्धाची धमकी दिली.
आपल्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झालाच, तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करील, असा इशारा पेस्कोव्ह यांनी दिला. याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना सज्जतेचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी रशियाने आपल्या जनतेसाठी न्यूक्लिअर ड्रिल अर्थात आण्विक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काय करायचे, याचा सराव आयोजित केला होता. यामुळे रशियाकडून दिली जाणारी ही धमकी पोकळ नसल्याचे उघड होत आहे. यामुळे युरोपिय देश धास्तावले असून युक्रेनमधील युद्धाबाबतची युरोपिय देशांची भूमिका आता बदलू लागल्याचे संकेत मिळत आहेत.
अशा परिस्थितीत नाटोने अणुयुद्धावरून रशियाला इशारा दिला. काही झाले तरी रशिया अणुयुद्ध जिंकू शकत नाही, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी म्हटले आहे.
Click below to express your thoughts and views on this news:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |