रशिया क्षेपणास्त्रे व ‘अंडरवॉटर ड्रोन्स’साठी ‘न्यूक्लिअर रिअॅक्टर्स’चा वापर करणार चाचण्या पूर्ण झाल्याची रशियन सूत्रांची माहिती

रशिया क्षेपणास्त्रे व ‘अंडरवॉटर ड्रोन्स’साठी ‘न्यूक्लिअर रिअॅक्टर्स’चा वापर करणार चाचण्या पूर्ण झाल्याची रशियन सूत्रांची माहिती

मॉस्को – रशियाने क्षेपणास्त्रे व ‘अंडरवॉटर ड्रोन्स’साठी छोट्या अणुभट्ट्या विकसित केल्या असून त्याच्या चाचण्या पार पडल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. गेल्याच आठवड्यात रशियाने अतिप्रगत श्रेणीतील अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, अभेद्य हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रवाहू पाणबुडीची निर्मिती केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली होती.

‘रशियाने अमर्याद क्षमता असलेली क्रूझ क्षेपणास्त्रे व पाण्याखाली कार्यरत राहणार्‍या बहुउद्देशीय ड्रोन्ससाठी छोट्या आकाराच्या अणुऊर्जेची निर्मिती करणार्‍या यंत्रणांच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आजच्या घडीला अशा प्रकारच्या यंत्रणांचे तंत्रज्ञान, आराखडा व त्याचा वापर फक्त रशियालाच शक्य झाला आहे’, अशा शब्दात रशियाच्या लष्करी सूत्रांनी संरक्षणक्षेत्रासाठी छोट्या अणुभट्टीची निर्मिती यशस्वी झाल्याचा दावा केला.

नव्या चाचण्या म्हणजे रशियाबरोबर सहकार्य नाकारणार्‍या पाश्चात्य देशांना आवश्यक ‘संदेश’ देण्याचा प्रयत्न असून यापूर्वीही असे संकेत देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. पाश्चात्य देशांनी रशियाचे सामरिक सामर्थ्य निष्प्रभ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले असून, ते निष्फळ ठरल्याचेही लष्करी सूत्रांनी बजावले. ‘पाश्चात्य देशांना त्यांच्या तांत्रिक सामर्थ्याबद्दल गैरसमजुती असून त्यांनी रशियाने दिलेले ‘संदेश’ समजून घेतलेले नाहीत. यापुढे त्यांना आमच्याशी बरोबरी करण्याचे प्रयत्न करावे लागतील व त्याचवेळी त्याचे परिणामही भोगावे लागतील’, असा इशारा रशियाच्या लष्करी सूत्रांनी दिला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही वर्षात रशियन संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना राबविली असून त्याअंतर्गत २०२० सालापर्यंत संरक्षणदलांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. त्यासाठी अणुऊर्जा, हायपरसोनिक तंत्रज्ञान, लेझर, आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोट्स यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. रशियाच्या संरक्षण अधिकार्यांनी गेल्या काही वर्षात या तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रे व यंत्रणा विकसित केल्याचेही संकेत दिले आहेत. ‘इतर देशांच्या तुलनेत रशियन क्षेपणास्त्रे सर्वाधिक पल्ल्याची असून जगातील कोणताही देश या क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित नाही’, हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशाराही लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)