Breaking News

चीनचे उपग्रहभेदी ‘डीएन-३’ क्षेपणास्त्र


मॉस्को, दि. ८ (वृत्तसंस्था) – ‘ज्यात रशिया नाही, असे जग कशासाठी शिल्लक ठेवायचे? त्यामुळे रशियावर अण्वस्त्रांचा हल्ला झालाच, तर रशिया सारे जग भस्मसात करून टाकील’, अशा भयंकर शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुयुद्धाच्या महाभयंकर परिणामांची जाणीव करून दिली आहे. याआधीही रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या क्षेपणास्त्रांच्या मार्‍यापासून जगातील कुठलाही देश सुरक्षित नसल्याचे बजावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जग खाक करून टाकण्याची धमकी देऊन सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या रशियामध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून लवकरच या निवडणूका संपन्न होणार आहे. या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान बोलताना रशियन राष्ट्राध्यक्षांनी अणुयुद्धाबाबतची सर्वात गंभीर धमकी दिली. ‘रशिया कधीही अणुयुद्ध सुरू करणार नाही. पण जर रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी रशियाच्या दिशेने सुटलेल्या अण्वस्त्रांची माहिती दिली व ही अण्वस्त्रे कुठे आदळतील, हे ही अचूकपणे सांगितले, तर मात्र रशिया स्वस्थ बसणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. ‘अशा वेळी रशिया आपल्यावरील अणुहल्ल्याला प्रत्युत्तर देईल. ज्या जगात रशिया शिल्लक राहू शकत नाही, असे जग वाचविण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे रशिया अशा परिस्थितीत सारे जग भस्मसात करून टाकील’, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली.

आपल्यावरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा सनदशीर अधिकार रशियाला आहे, याचीही आठवण रशियन राष्ट्राध्यक्षांनी करून दिली. गेल्या आठवड्यातही रशियन राष्ट्राध्यक्षांनी अशाच प्रकारची विधाने करून आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजविली होती. रशियाकडील क्षेपणास्त्रांच्या मार्‍यापासून जगातला कुठलाही देश सुरक्षित राहू शकत नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी पुतिन यांच्या विधानांची खिल्ली उडविली होती. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची विधाने हास्यस्पद असल्याचा दावा राईस यांनी केला होता.

‘८० च्या दशकात रशियाकडे अमेरिकेला लक्ष्य करू शकणारी क्षेपणास्त्रे होती. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष जर अमेरिकेला ही धमकी देत असतील, तर त्यात काहीच नवे नाही. उलट ही बाब हास्यास्पद ठरते’, असा दावा कॉन्डोलिझा राईस यांनी केला होता. यानंतर पुन्हा एकदा रशियन राष्ट्राध्यक्षांनी अणुयुद्धाची शक्यता वर्तवून त्यावर सार्‍या जगाला गंभीर इशारा दिल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून वारंवार आण्विक चाचण्या करून सार्‍या जगाला धोक्यात टाकणार्‍या उत्तर कोरियाचे बेजबाबदार हुकूमशहा किम जाँग-ऊन यांच्याकडून सातत्याने अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण एका मर्यादेच्या बाहेर त्यांच्या अणुहल्ल्याच्या धमक्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र रशियासारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी अणुहल्ल्याबाबत केलेली ही विधाने आण्विक संहाराच्या भयंकर शक्यता जगासमोर उभ्या करीत आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या धमक्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)