युरोपमध्ये युद्ध भडकल्यास रशिया नाटोचा धुव्वा उडवेल

- अमेरिकी अभ्यासगट ‘रँड कॉर्पोरेशन’चा अहवाल

युरोपमध्ये युद्ध भडकल्यास रशिया नाटोचा धुव्वा उडवेल

वॉशिंग्टन – युरोपात युद्ध पेटलेच, तर रशियाला थोपवणे नाटोला शक्य होणार नाही. रशिया सहजपणे नाटोच्या सैन्याचा धुव्वा उडवून बाल्टिक देशांचा ताबा घेईल, असा दावा ‘रँड कॉर्पोरेशन’ या अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे. शीतयुद्धानंतरच्या काळात रशिया व नाटोच्या संरक्षणसामर्थ्यात मोठी घट झाली होती. पण रशियाने झपाट्याने आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यात यश मिळवले, याकडे या अभ्यासगटाने लक्ष वेधले.

गेल्याच महिन्यात ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’च्या अहवालात, युरोप व रशियादरम्यान अनावधानाने लष्करी संघर्षाला तोंड फुटू शकते, असा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकी अभ्यासगटाचा अहवाल अतिशय महत्त्वाचा ठरतो. ‘अॅसेसिंग द कन्व्हेंशनल फोर्स इम्बॅलन्स इन युरोप’ नावाच्या या अहवालात शीतयुद्धानंतरच्या कालावधीत रशिया व नाटोच्या संरक्षणसामर्थ्यात कसे बदल झाले, याचा वेध घेण्यात आला आहे.

रशियन सीमेला? लागून असलेल्या ‘बाल्टिक’ देशांमधील नाटोची तयारी व सामर्थ्य याकडे अहवालात प्राधान्याने लक्ष वेधण्यात आले. रशियाने गेल्या दशकभरात आपले संरक्षणसामर्थ्य वाढविण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून सामरिकदृष्ट्या त्याचा आक्रमक वापर करण्याचे धोरण राबविले आहे. हे धोरण पाहता नजिकच्या काळात बाल्टिक क्षेत्रात संघर्ष उद्भवल्यास रशिया सहजगत्या त्यावर ताबा मिळवून आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, असे अहवालात स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

रशियाने आपली संरक्षणदले अधिकाधिक आधुनिक करण्यावर भर दिला असून त्यांच्या वेगवान हालचालींवर विशेष लक्ष दिले आहे. त्याचवेळी नवनवीन शस्त्रास्त्र यंत्रणा संरक्षणदलांमध्ये सहभागी करून त्यांची तैनाती वाढविण्यासाठी आवश्यक पावलेही उचलली आहेत. रशियन संरक्षणदलांनी युरोपला जोडून असलेल्या सीमेवर मोठी तैनाती करतानाच अंतर्गत क्षेत्राचे रक्षण करण्याची क्षमताही विकसित केली असल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालात करण्यात आला. मोठ्या प्रमाणावरील लष्करी पथकांची तैनाती व प्रगत शस्त्रांचा सहभाग हे रशियन संरक्षणदलाचे वैशिष्ट्य असल्याचेही अहवालात सांगण्यात आले.

धुव्वा रशियाने २०१४ साली क्रिमिआवर मिळविलेल्या ताब्यानंतर नाटोने आपल्या संरक्षणसामर्ध्याकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. गेल्या चार वर्षात ‘युरोपियन बटालिअन्स’ची उभारणी व अमेरिकेच्या लष्करी पथकांची तैनाती यावर भर देत नाटोने युद्धसज्जतेसाठी पावले उचलली आहेत. मात्र नाटोची ही तयारी रशियन क्षमतेच्या तुलनेत पुरेशी नसल्याचे अमेरिकी अभ्यासगटाने बजावले.

बाल्टिक देशांचाच विचार करता रशियाची तैनाती जवळपास ७८ हजार सैनिकांची आहे तर नाटोची क्षमता जेमतेम ३२ हजारांची असल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले. रशिया बाल्टिकवर आक्रमण करण्यास तब्बल ७५० हून अधिक रणगाडे घुसवू शकतो तर त्याच्या प्रतिकारासाठी नाटोकडे फक्त १२९ रणगाडेच आहेत, अशी चिंता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात रशियाने कॅलिनिनग्रॅड या संरक्षणतळावर ‘इस्कंदर’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची कायमस्वरूपी तैनाती सुरू केल्याचे उघड झाले आहे. रशियाची ही तैनाती अर्ध्या युरोपला लक्ष्य करणारी असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)