Breaking News

तिसर्‍या महायुद्धासाठी तयार रहा – तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

अंकारा – ‘‘तिसर्‍या महायुद्धासाठी’ तयार रहा’’, असा संदेश तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ‘रेसेप एर्दोगन’ यांनी आपल्या जनतेला दिला आहे. तुर्कीची राजधानी अंकारा येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी हा इशारा दिला. सिरियातील अमेरिकेचे लष्करी तळ ही तिसर्‍या महायुद्धाची सुरूवात ठरू शकेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला. या क्षेत्रात तुर्की, रशिया व इराणचे लष्कर तैनात आहेत, याची आठवण करून देऊन, एर्दोगन यांनी तिसर्‍या महायुद्धाच्या भयंकर धोक्याची जाणीव करून दिली.

तुर्कीने गेल्या महिन्यापासून तुर्की-सिरिया सीमेनजिक असलेल्या सिरियातील ‘आफ्रिन’ भागात व्यापक लष्करी मोहीम हाती घेतली होती. या क्षेत्रानजिक असलेल्या ‘मनबिज’मध्ये अमेरिकेचे सैनिक तैनात असून ते कुर्दांना प्रशिक्षण देत असल्याचा दावा करण्यात येतो. या मुद्यावरून तुर्की व अमेरिकेत प्रचंड तणाव असून तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. अंकारामध्ये तिसर्‍या महायुद्धाचा इशारा देताना एर्दोगन यांनी अमेरिकेच्या लष्करी तळांबाबत केलेला उल्लेख याच संघर्षाशी निगडीत आहे.

‘अमेरिका सिरियात २० लष्करी तळ उभारत आहे. हे तळ तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडण्याचे मुख्य कारण ठरु शकतात. याच भागात तुर्कीसह रशिया व इराणचेही लष्करी तैनात आहेत. म्हणूनच अमेरिकेच्या लष्करी तळांमुळे या भागात सर्वंकष युद्धाचा भडका उडू शकतो’, अशा शब्दात तुर्की राष्ट्राध्यक्षांनी तिसर्‍या महायुद्धाचा इशारा दिला.

यापूर्वी २०१५ साली तुर्कीचे तत्कालिन पंतप्रधान अहमत दावुतोग्लु यांनीही तिसरे महायुद्ध भडकण्याचा इशारा देऊन ते रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत, असे बजावले होते. तर काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आत्ताच्या तुर्कीचा विस्तार ‘ऑटोमन साम्राज्याइतका’ करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली होती.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)