Breaking News

अंतराळ युद्धासाठी अमेरिकेला ‘स्पेस फोर्स’ची आवश्यकता – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कॅलिफोर्निया – जमीन, सागर आणि आकाशाप्रमाणे अंतराळ देखील युद्धक्षेत्र बनले आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे अंतराळातही लष्करी विभाग, ‘स्पेस फोर्स’ स्थापन करण्याची आवश्यक आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या ‘स्पेस फोर्स’साठी अमेरिकेचे लष्कर मोठी भूमिका पार पाडेल, असा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला. दरम्यान, रशिया आणि चीन अंतराळातील अमेरिकेच्या उपग्रहांवर हल्ले चढवतील, असा इशारा अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विभागाने दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केल्याचे दिसते.

दोन दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागो शहरातील मरिन कॉर्पस्च्या ‘मिरमार’ हवाईतळावर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स’ची संकल्पना मांडली. गेल्या काही महिन्यांमध्ये व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तयार केलेल्या धोरणांमध्ये अंतराळ ही येत्या काळातील नवी युद्धभूमी असेल, असे अधोरेखित केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. त्यामुळे अंतराळातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी पृथ्वीच्या वातावरण कक्षात ‘स्पेस फोर्स’ तैनात करणे गरजेचे असल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेच्या हवाईदलाप्रमाणे ‘स्पेस फोर्स’ काम करील असे सांगून याबाबत आपण फार गंभीर असल्याची ग्वाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. ‘‘प्रशासकीय आणि खाजगी स्तरावर अमेरिका अंतराळात मोठी गुंतवणूक करीत आहे. अंतराळ क्षेत्राच्या विकासावर अमेरिकेचे यश अवलंबून आहे. त्यामुळे या अंतराळ क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला ‘स्पेस फोर्स’ची आवश्यकता आहे’’, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले.

अमेरिकेच्या या स्पेस फोर्समध्ये अमेरिकी लष्करातील अधिकार्‍यांचा समावेश असेल, असे संकेतही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले. अमेरिकी लष्कर, हवाईदल तसेच मरिन्सचे काही जवान अंतराळकार्यक्रमात याआधीच सहभागी झाले असून ते अंतराळवीर म्हणूनही काम करीत आहेत. या अंतराळवीर सैनिकांचा वापर ‘स्पेस फोर्स’साठी करता येऊ शकतो, असे ट्रम्प पुढे म्हणाले. असे झाले तर भविष्यातही अमेरिका ‘स्पेस फोर्स’च्या सहाय्याने अंतराळाचे नेतृत्व करू शकतो, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेल्या ‘स्पेस फोर्स’च्या योजनेला माईक रॉजर्स आणि काही रिपब्लिकन नेत्यांनी समर्थन दिले आहे. अंतराळ सुरक्षा हा एक गंभीर मुद्दा असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेली योजना योग्य असल्याचे रॉजर्स म्हणाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पहिल्यांदा ‘स्पेस फोर्स’ची योजना मांडली होती. त्यानंतर अमेरिकन प्रतिनिधीगृहातील सिनेटर्सच्या एका गटाने सदर योजना उचलून धरली होती. तसेच या ‘स्पेस फोर्स’साठी अमेरिकन हवाईदलाचा वापर करण्यात यावा, हवाईदलाचे दोन विभाग करावेत, असा प्रस्तावही या सिनेटर्सनी मांडला होता. पण अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांनी ट्रम्प यांचा हा प्रस्ताव धुडकावला होता. ‘स्पेस फोर्स’ची निर्मिती करून अमेरिका अंतराळातील शस्त्रस्पर्धेला आमंत्रण देऊ शकतो, अशी टीका काही काँग्रेसच्या सदस्यांनी केली होती.

दरम्यान, अमेरिकेच्याही आधी रशियाने अंतराळासाठी आपली स्वतंत्र ‘स्पेस फोर्स’ विकसित केली आहे. रशियाने अंतराळातील आपल्या या लष्करी गटाला ‘एअरोस्पेस फोर्सेस’ असे नाव दिले आहे. या व्यतिरिक्त रशिया आणि चीन अंतराळ युद्धाची तयारी करीत असल्याचा दावा अमेरिकी यंत्रणा करीत आहेत. ‘अमेरिकेचे उपग्रह नष्ट करण्याचे सामर्थ्य रशिया व चीनकडे आहे. सध्या हे दोन्ही देश अंतराळ क्षेत्रात शांततेचा पुरस्कार करीत असले तरी प्रत्यक्षात अंतराळ युद्ध पेटले तर परिस्थिती वेगळी असेल’, असा इशारा अमेरिकेच्या जनरल रॉबर्ट अ‍ॅश्‍ले व डॅन कोटस् या अधिकार्‍यांनी दिला होता.

अमेरिका मोठ्या प्रमाणात लष्करी व खाजगी उपग्रहांवर अवलंबून आहे, हे ठाऊक असलेले चीन व रशिया उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे, एनर्जी वेपन अथवा लेझर, सायबर जॅमिंग आणि अंतराळातील इतर उपग्रह वापरून अमेरिकेच्या उपग्रहांना नष्ट करू शकतात, असे जनरल रॉबर्ट अ‍ॅश्‍ले व डॅन कोटस् यांनी गेल्याच आठवड्यात बजावले होते.