सिरियावरच्या नव्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय अराजक माजेल : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

सिरियावरच्या नव्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय अराजक माजेल : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – ‘यापुढे अमेरिकेने सिरियावर हल्ला चढविला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अराजक माजेल’, अशी धमकी  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्याबरोबरील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चर्चेचा हवाला देऊन, रशियन यंत्रणांनी हा दावा केला. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सिरियावर चढविलेला हल्ला पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि हे एका देशाच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन ठरते, यावरही रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्यात एक मत झाल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून रशियाने अमेरिका व मित्रदेशांच्या सिरियावरील हल्ल्याच्या विरोधात ठराव मांडला होता. या ठरावाच्या मुद्यावर रशिया एकाकी पडल्याचे दिसत होते. चीननेही अमेरिका व मित्रदेशांच्या पूर्णपणे विरोधात जाण्यास नकार दिल्याने रशियाची कोंडी झाल्याचे सुरक्षा परिषदेत पहायला मिळाले. मात्र यानंतर रशिया अधिकच आक्रमक बनल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका व मित्रदेशांना सिरियावरील नव्या हल्ल्याच्या विरोधात धमकी दिली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी सिरियन राजवटीने पुन्हा रासायनिक हल्ले चढविल्यास, अमेरिकेची क्षेपणास्‍त्रे तयारच असल्याचे बजावले होते. त्या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांची ही नवी धमकी प्रसिद्ध झाली होती.  ‘सिरियावर नवे हल्ले झाले तर ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन ठरेल. वारंवार अशारितीने नियमांचे उल्लंघन होत राहिले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अराजक माजल्याखेरीज राहणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्याबरोबरील चर्चेत म्हटल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली.

दरम्यान, सिरियावरील हल्ल्याला उत्तर मिळेल, असे रशियाने या हल्ल्यानंतर बजावले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तसा इशाराच अमेरिका व मित्रदेशांना दिला होता. पण हे उत्तर कोणत्या स्वरूपाचे असेल, यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन किंवा अन्य रशियन नेत्यांनी प्रकाश टाकला नव्हता. त्यामुळे रशियाच्या अमेरिका व मित्रदेशांविरोधातील संभाव्य कारवाईची चर्चा पाश्‍चिमात्य माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. ब्रिटनच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी रशिया आपल्या देशावर घणाघाती सायबर हल्ले चढवील, असे बजावले होते. यासाठी ब्रिटन तसेच अमेरिका व फ्रान्सने तयार रहावे, असे या अधिकार्‍यांनी सुचविले होते.

तर रशियन अधिकारी उघडपणे आपल्या देशाच्या प्रतिसादाबद्दल बोलत नसले तरी अमेरिका, फ्रान्स व ब्रिटनच्या सिरियावरील हल्ल्यामुळे अणुयुद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक इशारे देत आहेत.

रशियाच्या दोन युद्धनौका प्रचंड शस्‍त्रसाठ्यासह सिरियाच्या दिशेने रवाना

मॉस्को/दमास्कस – शनिवारी पहाटे अमेरिका-ब्रिटन-फ्रान्सने सिरियात केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाची जोरदार तयारी सुरू झाली असून दोन अतिरिक्त युद्धनौका व शस्त्रसाठा सिरियाच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे. रविवारी तुर्कीनजिकच्या ‘बॉस्फोरस सामुद्रधुनी’त रशियन युद्धनौका दिसल्याचे वृत्त समोर आले असून त्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत.

नौदल विश्‍लेषक ‘युरुक इसिक’ यांनी ‘ट्विटर’वरून रशियन युद्धनौकांची छायाचित्रे प्रसिद्ध करून नव्या हालचालींची माहिती उघड केली. त्यात दोन रशियन युद्धनौका दिसत असून त्यावर रणगाडे, सशस्‍त्र वाहने, हायस्पीड पॅट्रोल बोट्स, ‘आयइडी रडार’ यांचा समावेश आहे. या युद्धनौकांमध्ये ‘प्रोजेक्ट ११७ ऍलिगेटर क्लास’ व ‘रो रो अलेक्झांडर कॅशेन्को’ यांचा समावेश आहे. रशियाने गेल्या दोन वर्षात सिरियात १० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले असून ‘तार्तूस’ व ‘खेमिम’ या ठिकाणी संरक्षणतळही कार्यरत आहेत. या तळांबरोबरच ‘एस-४००’, ‘एस-३००’ या प्रगत क्षेपणास्‍त्रभेदी यंत्रणा तसेच प्रगत युद्धनौका, विनाशिका व पाणबुड्याही तैनात आहेत.

रशियाच्या या सहकार्याच्या बळावर सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांनी देशावरील आपली पकड मजबूत करण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते. मात्र अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने चढविलेल्या हल्ल्यामुळे सिरियातील संघर्षाचे पारडे अस्साद यांच्या विरोधात फिरेल, अशी शक्यता वर्तविली जाते.

 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/986206998877192194
https://www.facebook.com/WW3Info/posts/384061015335722