Breaking News

व्हिएतनामच्या दिशेने जाणार्‍या  ऑस्ट्रेलियाच्या युद्धनौकांना चीनने आव्हान दिले

कॅनबेरा/बीजिंग – व्हिएतनामच्या ‘सदिच्छा भेटीसाठी’ जात असलेल्या ऑस्ट्रेलियन नौदलाच्या विनाशिकांना चीनच्या नौदलाचे आव्हान दिले. १५ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेची माहिती माध्यमांसमोर आली असून यामुळे ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील तणावात अधिकच भर पडल्याचे दिसत आहे. या सागरी क्षेत्रातील चीनची अरेरावी दिवसागणिक वाढत चालल्याचे या निमित्ताने आणखी एकवार समोर  आले आहे. आधीही ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातून प्रवास करणारी जहाजे व युद्धनौका यांना रोखून चीनने हे क्षेत्र आपल्याच मालकीचे असल्याचा दावा भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता.

ऑस्ट्रेलियन नौदलाच्या युद्धनौका तीन महिन्यांच्या आग्नेय आशिया मोहिमेवर रवाना झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या ‘एचएमएएस ऍन्झॅक’, ‘एचएमएएस सक्सेस’ व ‘एचएमएएस तुवुम्बा’ या तीन युद्धनौका व्हिएतनाम दौर्‍यासाठी दाखल होण्यासाठी निघाल्या होत्या. रविवारी १५ एप्रिलला या युद्धनौका ‘साऊथ चायना सी’मध्ये असताना चिनी नौदलाने त्यांना ‘वॉर्निंग’चा संदेश दिला. ऑस्ट्रेलियन युद्धनौकांनी चिनी नौदलाला योग्य प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांना पुढे जाण्याबाबत निर्देश देण्यात आले, अशी माहिती ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली.

चीनच्या संरक्षण विभागाने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचे दावे नाकारले असून ते तथ्यावर आधारित नसल्याचा आरोप केला. चिनी नौदलाने व्यावसायिक स्तरावर ऑस्ट्रेलियन नौदलाशी संपर्क साधला व त्यांनीही त्याच प्रकारे प्रतिसाद दिला, असे स्पष्टीकरण चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिले. चीनच्या परराष्ट्र विभागानेही आपल्या नौदलाच्या कृतीचे समर्थन केले आहे.

चीनचा विरोध असला तरी ‘साऊथ चायना सी’मध्ये ऑस्ट्रेलिया सराव करणार

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ठणकावले

कॅनबेरा/बीजिंग – आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार ऑस्ट्रेलियाच्या नौदलाला जगातील सर्व सागरी क्षेत्रात वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यात ‘साऊथ चायना सी’चाही समावेश आहे, अशा खणखणीत शब्दात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी चीनला ठणकावले. काही दिवसांपूर्वी चीनच्या नौदलाने ‘साऊथ चायना सी’मधून व्हिएतनामला भेट देणार्‍या ऑस्ट्रेलियन युद्धनौकांना आव्हान दिल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणावर परखड भूमिका मांडणार्‍या पंतप्रधान टर्नबुल यांनी आपल्या वक्तव्यातून ऑस्ट्रेलिया चीनच्या दबावापुढे न झुकता स्वतंत्र व आक्रमक धोरण कायम राखेल, असे स्पष्ट संकेत दिले.

‘‘ऑस्ट्रेलियाच्या नौदलाला जगभरात   सर्व प्रकारच्या वाहतुकीचे स्वातंत्र्य आहे आणि त्याचा आधार घेऊन आम्ही कृती करतो. चीनच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियन नौदलाला जगातील सागरी क्षेत्रात असलेल्या वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित होतो. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ऑस्ट्रेलियाच्या युद्धनौकांना जगातील सर्व सागरी क्षेत्रात वाहतुकीचे स्वातंत्र्य असून त्यात ‘साऊथ चायना सी’चाही समावेश होतो’’, अशा शब्दात पंतप्रधान टर्नबुल यांनी ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया व चीन यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे चित्र समोर येत होते. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड यांनी चीनबरोबरील संबंध खूपच वाढविले होते. मात्र   टर्नबुल यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने चीनच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातील चीनच्या प्रभावाबाबत अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आली असून ऑस्ट्रेलियातील एका प्रभावशाली संसद सदस्यांना राजीनामाही द्यावा लागला होता.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र विभागाने देशाचे परराष्ट्र धोरण व त्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करणारी ‘श्‍वेतपत्रिका’न प्रसिद्ध केली होती. त्यात चीन अमेरिकेच्या  वर्चस्वाला आव्हान देत असून त्यांचा ‘साऊथ चायना सी’मधील लष्करी विस्तार आशियातील नव्या संघर्षाला कारणीभूत ठरेल, असा उघड इशारा देण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया व सभोवतालच्या क्षेत्राचा ‘इंडोपॅसिफिक’ असा उल्लेख करून या क्षेत्राचे भवितव्य ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे ही ऑस्ट्रेलियाची महत्त्वाकांक्षा असल्याचे त्यात बजावण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियन नौदलाच्या विनाशिकांचा आग्नेय आशियातील दौराही त्याचाच भाग असून या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्याच्या  प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसत आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/987906635493453825
https://www.facebook.com/WW3Info/posts/385324525209371