Breaking News

चीन ऑस्ट्रेलियाशी मानसिक दबावतंत्राचे युद्ध खेळत आहे – ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांचा आरोप

कॅनबेरा/वॉशिंग्टन – ‘सध्याच्या परिस्थितीत चीन अमेरिकेवर दादागिरी करू शकत नाही. तसा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम अनपेक्षित व जबरदस्त फटका देणारे ठरतील, याची चीनला जाणीव आहे. त्यामुळे चीनने आता अमेरिकेच्या मित्रदेशांवर दडपण आणण्यास सुरुवात केली आहे. चीन ऑस्ट्रेलियाविरोधात ‘सायकॉलॉजिकल वॉरफेअर’चा अर्थात मानसिक दबावतंत्राच्या युद्धाचा अवलंब करीत असून आवश्यकता भासली तर ऑस्ट्रेलियाला शिक्षा करण्यासाठी चीन कचरणार नाही’, असा खळबळजनक आरोप ऑस्ट्रेलियाचे प्राध्यापक व लेखक क्लाईव्ह हॅमिल्टन यांनी केला.

प्राध्यापक क्लाईव्ह हॅमिल्टन यांचे ‘सायलेंट इन्व्हॅजन: चायनाज् इन्फ्ल्युअन्स इन ऑस्ट्रेलिया’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियासह अमेरिका व ब्रिटनमध्ये हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरले असून सरकारी पातळीवरही याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

या पुस्तकात हॅमिल्टन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली चीन ऑस्ट्रेलियातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियातील राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शिक्षणसंस्था व उद्योगक्षेत्राला चीनने मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य पुरविले असून त्या बळावर हस्तक्षेप सुरू असल्याचे हॅमिल्टन यांनी बजावले आहे.

चीनच्या या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या संसदेने प्राध्यापक हॅमिल्टन यांना विशेष आमंत्रण दिले होते. अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर हॅमिल्टन यांनी विविध उदाहरणे देऊन चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाची माहिती दिली. ‘साऊथ चायना सी’मध्ये ऑस्ट्रेलियन युद्धनौकांना रोखण्याचा झालेला प्रयत्न व चीनच्या ऑस्ट्रेलियातील राजदूतांनी दिलेला इशारा याचा उल्लेख करून त्यांनी चीनच्या वाढत्या अरेरावीबद्दल इशारा दिला. ऑस्ट्रेलियाने चीनला मोकळीक दिली त्याचे गंभीर परिणाम ऑस्ट्रेलियाला भोगावे लागतील, असेही हॅमिल्टन यांनी बजावले.

प्राध्यापक हॅमिल्टन यांच्या पुस्तकावर चीनने जोरदार टीका केली असून हे पुस्तक म्हणजे द्वेषयुक्त प्रचार आणि बदनामीचा भाग आहे, अशा शब्दात आपल्यावरील आरोप नाकारले. चीनमधील ५०हून अधिक अभ्यासकांनी ऑस्ट्रेलियात चीनवर होणार्‍या टीकेला विरोध करणारे खुले पत्र प्रसिद्ध करुन, चीन हस्तक्षेप करत नसल्याचा दावा केला.

मात्र गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियातील चीनच्या हस्तक्षेपाच्या घटना सातत्याने समोर येत असून या घटनांमुळे दोन देशांमधील तणाव प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनी चीनच्या मुद्द्यावर अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘साऊथ चायना सी’, अमेरिकेबरोबरील सहकार्य या मुद्द्यांवर ऑस्ट्रेलिया चीनच्या दडपणापुढे झुकणार नाही, असे टर्नबूल यांनी खडसावले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील एका अभ्यासगटाने चीनबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, ऑस्ट्रेलियन सरकारने चीनचे लष्करी वर्चस्व रोखण्यासाठी पश्‍चिम ऑस्ट्रेलियात अमेरिकी युद्धनौकांच्या तैनातीस मान्यता द्यावी, अशी शिफारस केली आहे.

 

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/991214578016010240
https://www.facebook.com/WW3Info/posts/388824661526024