Breaking News

चीनला शह देण्यासाठी ‘फ्रान्स-भारत-ऑस्ट्रेलिया’ची ‘इंडो-पॅसिफिक’ सागरी क्षेत्रात धोरणात्मक आघाडी – फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा प्रस्ताव

कॅनबेरा – नियमांची योग्य अंमलबजावणी व वर्चस्ववादाला विरोध या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणी करून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनला शह देण्यासाठी ‘फ्रान्स-भारत-ऑस्ट्रेलिया’ची नवी आघाडी उभी करण्याचे संकेत दिले. अमेरिकेने यापूर्वीच चीनचा प्रभाव रोखण्यासाठी ‘भारत-जपान-ऑस्ट्रेलिया’सह आघाडी उभारली असून चीनने त्यावर नाराजी दर्शविली आहे. या पार्श्‍वभूमीवर, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी दिलेले संकेत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात चीनची दादागिरी थांबविण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दाखवून देत आहेत.

मंगळवारी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांची भेट घेतली. यावेळी दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संरक्षण, सायबरसुरक्षा, शिक्षण, संशोधन व हवामानबदल या क्षेत्रांमध्ये विविध करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्स व ऑस्ट्रेलियाच्या सहकार्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मॅक्रॉन यांनी चीनला लक्ष्य केले.

‘आम्ही भाबडेपणा बाळगणारे देश नाही. चीनने आम्हांला समान भागीदार म्हणून आदर करावा व वागणूक द्यावी असे वाटत असेल, तर आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी चीनला रोखण्यासाठी इतर देशांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे बजावले. त्यांनी पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्सचे भूभाग असलेल्या ‘न्यू कॅलेडॉनिया’ व ‘फ्रेंच पॉलिनेशिया’ तसेच हिंदी महासागरातील ‘रियुनियन आयलंड’चा उल्लेख केला.

‘पॅसिफिक व हिंदी महासागरातील फ्रान्सच्या वसाहतींमुळे फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील उद्दिष्टांना महत्त्व प्राप्त झाले आहे. हाच मुद्दा नव्या इंडो-पॅसिफिक आघाडीचा केंद्रबिंदू ठरतो. ब्रेग्झिटनंतर फ्रान्स हा इंडो-पॅसिफिक भागातील युरोपिय महासंघाचा हिस्सा असणारा एकमेव देश असेल. त्यामुळे फ्रान्सला नव्या इंडो-पॅसिफिक आघाडीसाठी पुढाकार घ्यायची इच्छा आहे’, अशा शब्दात मॅक्रॉन यांनी नव्या आघाडीचे समर्थन केले.

ऑस्ट्रेलियाबरोबरच भारताचाही नव्या आघाडीत समावेश करणार्‍या फ्रान्सने, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता व समृद्धीसाठी या तीन देशांची आघाडी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे स्पष्ट संकेत दिले. जागतिक स्थैर्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्र मध्यवर्ती ठरेल, असे सांगून त्याचे आर्थिक व सुरक्षाविषयक हितसंबंध जपणे ही इंडो-पॅसिफिक आघाडीची जबाबदारी राहिल, असेही मॅक्रॉन म्हणाले. चीनचा उदय सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे आणि नवी आघाडी चीनविरोधातील नवा गट नाही, असेही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.

मात्र त्याचवेळी ‘साऊथ चायना सी’ व पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमक हालचाली खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशाराही मॅक्रॉन यांनी दिला. पॅसिफिक क्षेत्राचा विकास करताना तो नियमांच्या चौकटीत होणे आवश्यक असल्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बजावले. तसे झाले तरच या क्षेत्रातील आवश्यक समतोल कायम राहिल, असा दावाही त्यांनी पुढे केला. हाच संदर्भ घेऊन मॅक्रॉन यांनी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात कोणत्याही देशाने वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात चीनला लक्ष्य केले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चीनला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी ‘वन बेल्ट, वन रोड’ योजनेवरून चीनला चांगलेच फटकारले होते. ‘चीनच्या नव्या महत्त्वाकांक्षी योजनेत प्रस्तावित केलेले प्रकल्प नव्या वर्चस्ववादाचे किंवा जहागिरीचे प्रतीक ठरु नयेत’, असे मॅक्रॉन यांनी बजावले होते. आता ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला लक्ष्य करून फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या आक्रमकतेला लगाम घालण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/992311572021231616
https://www.facebook.com/WW3Info/posts/389904348084722