साखळदंडाने जखडलेला सैतान मृत्यूपंथाला लागलेला असला तरी सैतानाला कधीही फशी पडू नका – पोप फ्रान्सिस यांचे आवाहन

साखळदंडाने जखडलेला सैतान मृत्यूपंथाला लागलेला असला तरी सैतानाला कधीही फशी पडू नका – पोप फ्रान्सिस यांचे आवाहन

व्हॅटिकन सिटी -‘सैतान (डेव्हिल) मृत्यूपंथाला लागलेला आहे. असे असले तरी त्याच्या जवळ जाऊ नका. कारण साखळीने बांधल्याने वैतागलेल्या कुत्र्यासारखा तो तुमचा चावा घेऊ शकतो. त्यामुळे आपण सैतानाला फशी पडता कामा नये. आपण परमेश्‍वराच्या प्रार्थनेने त्याचा सामना करायला हवा’, असा संदेश ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी दिला आहे. तसेच कुणीही सैतानाने दिलेल्या आकर्षक वेस्टनातील भेटवस्तूंना भुलून जाऊ नये, असे पोप फ्रान्सिस यांनी बजावले आहे.

सैतान सध्या मृत्यूपंथाला लागलेला आहे. सर्वसामान्यांचा यावर विश्‍वास बसत नाही. कारण सैतान आपल्या ताकदीचे प्रदर्शन करून आपणच सर्वशक्तीमान आहोत, असे भासवित आहे. मात्र त्याचे मरण जवळ आले असले तरी आपण सैतानाच्या जवळ जाता कामा नये. साखळीने जखडलेला कुत्रा जसा आपला लचका तोडू शकतो, तसे सैतान आपल्या बाबतीत करील. मगरीची शिकार करणारे ती घायाळ झाल्यानंतरही आपल्या शेपटाने जीवघेणा हल्ला करू शकते, असा अनुभव सांगतात. सैतानाच्या बाबतीतही तसेच घडू शकते’, असे सांगून पोप फ्रान्सिस यांनी यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

‘सैतान आपल्याला आकर्षक वेस्टनात गुंडाळलेल्या भेटवस्तूंनी आणि गोड शब्दांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या आकर्षक दिसणार्‍या या भेटवस्तू म्हणजे नक्की काय आहे, ते तो कधीही कळू देत नाही. त्याच्याकडून आलेले सारे प्रस्ताव म्हणजे भ्रम असतो आणि आपण त्याला फशी पडतो. तसे होता कामा नये. सैतानाकडून येणार्‍या या आमिषांचा लखलखाट कायमस्वरुपी टिकणारा कधीच असू शकत नाही. काही काळानेच त्याची लकाकी संपून जाते. हा लखलखाट परमेश्‍वराच्या प्रकाशासारखा शांत आणि चिरस्थायी नसतो’ असे पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले.

व्हॅटिकनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेला संबोधित करताना पोप फ्रान्सिस यांनी भाविकांना हा संदेश दिला. काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी अशाच स्वरुपाचा संदेश देऊन भाविकांना सावध केले होते. परमेश्‍वरी मार्गाचा स्वीकार करताना, सैतानाला नाकारावेच लागते आणि हा नकार तात्पुरता नाही तर कायमस्वरुपी असावा लागतो, असे पोप फ्रान्सिस यांनी बजावले होते. तर याच्याही काही आठवडे आधी पोप फ्रान्सिस यांनी सैतान म्हणजे मिथक नाही, सैतान म्हणजे एखादी संकल्पना नाही, तर तो खरोखरच अस्तित्वात आहे, असे बजावले होते. तसेच त्याच्याशी संवाद साधून त्याला फशी न पडण्याचे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले होते.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/994907472342106113
https://www.facebook.com/WW3Info/posts/392537307821426