Breaking News

गाझापट्टीतून हल्ले झाल्यास इस्रायलची लढाऊ विमाने आणि रणगाडे सज्ज – इस्रायलच्या लष्कराचा इशारा

जेरूसलेम – जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करून इथे अमेरिकेचा दूतावास सुरू झाल्यानंतर, पॅलेस्टिनींच्या इस्रायली सीमेवर सुरू असलेल्या निदर्शनांचा भडका उडला. या निदर्शकांवर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत ६० जण ठार झाले असून जखमींची संख्या २७०० च्याही पुढे गेली आहे. पण ही निदर्शने अशीच सुरू राहिली आणि गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले झाले तर आमची लढाऊ विमाने आणि रणगाडे सज्ज आहेत, असा इशारा इस्रायली लष्कराने दिला आहे.

गाझापट्टीगेल्या सहा आठवड्यांपासून गाझापट्टीतील पॅलेस्टिनी निदर्शक इस्रायलच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. सोमवारी अमेरिकेच्या जेरूसलेममधील दूतावासाचे उद्घाटन झाले आणि यानंतर ही निदर्शने अधिकच तीव्र झाली. निदर्शकांनी सीमेवर हल्ला चढवून ‘काईट बॉम्ब’ तसेच ‘पाईप बॉम्ब’ आणि जळत्या टायर्सचा मारा केल्याचा आरोप करून इस्रायलने या निदर्शकांवर कारवाई सुरू केली. या कारवाईत ६० जण ठार झाले आहेत. तर जखमींची संख्या २७००हून अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही, असे या निदर्शनांचे आयोजन करणार्‍या ‘हमास’ने घोषित केले आहे.

‘आमच्या भूमीत घुसखोरी करणार्‍या इस्रायलला इथून हाकलून लावल्याखेरीज निदर्शने थांबणार नाहीत. आम्ही जेरूसलेमवर ताबा मिळविल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही’, असे हमासच्या नेत्यांनी जाहीर केले. याकरिता आपल्या जीवाचे बलिदान देण्यासाठी हजारो पॅलेस्टिनी तयार आहे, असे हमासच्या नेत्याने गेल्याच आठवड्यात बजावले होते. तर इस्रायलने या निदर्शनांच्या आड हमासचे दहशतवादी इस्रायलवर हल्ला चढवित असल्याचा आरोप केला. तसेच सोमवारी इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत हमासचे २४ दहशतवादी ठार झाल्याची माहिती इस्रायलने उघड केली.

तसेच सोमवारी इस्रायलने गाझापट्टीवर हमासच्या पाच ठिकाणांवर हल्ले चढवून ही ठिकाणे भुईसपाट केली. या हल्ल्याचे तपशील प्रसिद्ध झाले नसले तरी हे हमासच्या हिंसाचाराला इस्रायलने दिलेले प्रत्युत्तर असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. तसेच गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट्स तसेच इतर कुठलेही हल्ले झाले तर त्याला उत्तर देण्यासाठी इस्रायलची लढाऊ विमाने व रणगाडे सज्ज आहेत, असा इशारा इस्रायली लष्कराने दिला. हमास माघार घेण्यास तयार नसल्याने इस्रायलवर अशा प्रकारचे हल्ले होतच राहणार असून त्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने दिलेली कठोर कारवाईची धमकी, या क्षेत्रातील वातावरण स्फोटक बनवित आहे.

२०१४ साली झालेल्या इस्रायल-गाझा युद्धानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला असून याचे पडसाद या क्षेत्रासह जगभरात उमटण्याची दाट शक्यता आहे. तुर्की, लेबेनॉन या देशांमध्ये इस्रायलच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू असून जॉर्डन, इजिप्त या देशांनी इस्रायलच्या पॅलेस्टिनी निदर्शकांवरील कारवाईचा निषेध नोंदविला आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/997017989290459136
https://www.facebook.com/WW3Info/posts/394628277612329