Breaking News

ट्रम्प व किम जाँग-उन यांची चर्चा रद्द

टोकिओ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांच्याबरोबरील चर्चा रद्द करून टाकली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या भाषेत बदल झाल्याचे सांगून ‘किम जाँग-उन’ यांच्याबरोबरील चर्चा धोक्यात आल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून सदर चर्चा रद्द करण्याची घोषणा केली जात असताना, उत्तर कोरियानेही चर्चेसाठी अमेरिकेच्या विनवण्या करणार नसल्याची ताठर भूमिका स्वीकारली आहे.

चर्चाउत्तर कोरियाच्या हुकूमशहांबरोबरील चर्चेच्या आधी अमेरिकेच्या काही अटी मान्य करणे अनिवार्य आहे. उत्तर कोरियाने या अटी मान्य केल्या तरच चर्चा होईल, असे अमेरिकेने बजावले होते. उत्तर कोरियाकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे संकेत देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही चर्चा निकालात निघाल्याचे जाहीर केले. सदर निर्णय घेण्याच्या आधी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. किम जाँग-उन यांनी चीनमध्ये जाऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या भाषेत मोठे बदल झाल्याचे सांगून यामागे चीन असल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले होते.

दरम्यान, सदर चर्चा रद्द करणारे पत्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियन हुकूमशहांना पाठविले असून हे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात ट्रम्प यांनी अत्यंत संयमी शब्दात किम जाँग-उन यांना ही चर्चा सध्याच्या काळात अनुचित ठरेल, याची जाणीव करून दिली. उत्तर कोरियाकडून अमेरिकेच्या विरोधात केल्या जात असलेल्या जहाल विधानांच्या पार्श्‍वभूमीवर ही चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असा दावा ट्रम्प यांनी या पत्रात केला. तसेच पुढच्या काळात मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी उत्सुक असेन, असे सांगून ट्रम्प यांनी अखेरीस ही चर्चाच सर्वात महत्त्वाची ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

‘तुमच्या भूमिकेत काही बदल झालाच तर सिंगापूर येथे 12 जून रोजी होणार्‍या परिषदेच्या आधी माझ्याशी संपर्क साधताना अजिबात संकोच करू नका’, असा महत्त्वाचा संदेश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या पत्राच्या अखेरीस किम जाँग-उन यांना दिला आहे. ट्रम्प यांनी अत्यंत संयमी भाषेत उत्तर कोरियाच्या हुकूमशहांना लिहिलेले हे पत्र पुढच्या काळात या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते, असे संकेत देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांकडून एकमेकांना दिल्या जाणार्‍या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर हा संदेश महत्त्वाचा ठरू शकतो.

‘जर उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा मार्ग सोडून दिला नाही, तर या देशाचे हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांची अवस्था लिबियाची हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्याप्रमाणेच होईल. गद्दाफी यांना दयनीयरित्या लिबियन जनतेनेच संपविले होते. त्याचा दाखला देऊन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी किम जाँग-उन यांचेही तसेच होऊ शकते, असे धमकावले होते. मात्र ही धमकी नसून वस्तुस्थिती असल्याचा दावा पेन्स यांनी केला होता.

यावर उत्तर कोरियाकडून प्रत्युत्तर आले. उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री ‘शो सोन हुई’ यांनी पेन्स यांची विधाने मुर्खपणाची असल्याचा दावा केला. तसेच उत्तर कोरिया अमेरिकेकडे चर्चेसाठी याचना करणार नाही. अमेरिकेला चर्चा करायची नसेल, तर उत्तर कोरिया या चर्चेसाठी विनवण्याही करणार नाही, असे हुई यांनी स्पष्ट केले. पण जर ही चर्चा होणार नसेल, तर उत्तर कोरिया अमेरिकेच्या आक्रमणासाठीही तयार असेल, असा दावा करून आण्विक युद्धाची वेळ आली तरी उत्तर कोरिया कचरणार नाही, असा दावा उपपरराष्ट्रमंत्री हुई यांनी केला होता.

English हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info/status/999958251520385024
https://www.facebook.com/WW3Info/posts/397974647277692